फडणवीसांवरील वक्तव्यावरून राडा; भाजपच्या माजी आमदाराला डोळा सुजेस्तोवर मारहाण

बुलढाणा | राज्यातील कोरोना परिस्थीतीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात भाजप नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये चांगलाच वाद रंगू लागला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त भाषेत टीका केली.

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते. असं गायकवाड यांनी म्हटल्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद चांगलाच वाढला आहे. याचे पडसाद बुलढाण्यामध्ये पाहायला मिळाले. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी जयस्तंभ चौकात जमा झाले होते.

भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे, भाजप शहराध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र जमले होते. यावेळी आमदार गायकवाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घटनास्थळी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यांनी पुतळा जाळण्यास विरोध केला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. यामध्ये भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोळ्याला मार लागून त्यांंचा डोळा सुजला आहे..

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि कार्यकर्त्यांना शांत केले. यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकारानंतर बुलढाण्यात तणावचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय म्हणाले होते संजय गायकवाड

कोरोना प्रत्येक जातीधर्माच्या लोकांना विळखा घालत आहे. ज्याच्या  घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे. मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते. विरोधी पक्ष यावेळी राज्य सरकारला मदत करायची सोडून घाणेरडं राजकारण करत आहेत. असं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव; शिवसेना नेत्याची भाजप आमदाराला धमकी
बेड न मिळाल्याने बसस्थानकात थांबले, पतीचा त्रास वाढत गेला आणि पत्नीच्या उशालाच सोडला जीव
कोरोनाच्या संकटात टाटांनी घेतला पुढाकार, आता रोज होणार २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर होणार कारवाई.? आव्हाडांनी दिला काळ्याबाजाराचा पुरावा

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.