नियम मोडून २५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा आटोपला, नंतर त्यातील दोघांचा कोरोनाने मृत्यू

पुणे | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यातल्या त्यात लग्नासारख्या कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे.

लग्नाच्या वेळेस उपस्थितांची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे दोघेजण पुण्यातील नगर रस्त्यावर असलेल्या हयात रिजन्सीमध्ये आयोजित लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

या सोहळ्यात एकूण २५० जण आले होते अशी धक्कादायक माहिती तक्रारदाराने तक्रार करताना दिली आहे. एका वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार तक्रारदाराने सांगितले आहे की, लग्नाला आलेल्या दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून २५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी हयात हॉटेलचे व्यवस्थापक निशाल तिवारी आणि लग्नाचे आयोजन करणाऱ्या कपिल गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ३० जुनरोजी हे लग्न झाल्याचे गर्ग यांनी सांगितले आहे.

लग्न आपल्याच समाजातील उद्योजक कुटुंबातील असल्यामुळे लग्नाला ५० पेक्षा जास्त लोक आले होते अशी पक्की माहिती त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकीकडे पुण्यात कडकडीत लॉकडाऊन असताना अशा प्रकारे २५० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणे कितपत योग्य आहे.

हॉटेलमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज मागितले असता सीसीटीव्ही खराब असल्याचे हॉटेलकडून सांगण्यात आले. हॉटेलचे महाव्यवस्थापक शोबीत सॉहानी यांनी पोलिसांना या प्रकरणात पूर्णपणे सहकार्य करू असे म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.