बॉलीवूड उत्तर प्रदेशात हलवण्याची तयारी सुरू, योगी आदित्यनाथ उद्या मुंबईत घेणार आढावा..

मुंबई । सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणापासून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातच मुंबईमधून बॉलीवूड उत्तर प्रदेशमध्ये हलवण्याचे बोलले जात आहे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबईचा दौरा करणार आहेत.

योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये जाणार आहेत. यावेळी योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. यावरून त्यांच्यावर टीका देखील होत आहेत.

यावेळी ते बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. फिल्म सिटीमध्ये कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे हे समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी मुंबईला येत आहेत. मुंबईतील लोक उत्तर प्रदेशच्या फिल्म सिटीमध्ये काम करण्यासाठी येतील यासाठी योगी आदित्यनाथ दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा सल्ला घेणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार असल्याचे ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे.

सुशांत प्रकरण, बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शन यावरून बॉलीवूडची मोठी बदनामी झाली आहे. यातच आता मुंबईचे बॉलीवूड उत्तर प्रदेशात हलवणार असल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.