..आणि धाडसी अंगरक्षकाने पोलिस अधिक्षकांवरचा तलवारीचा वार स्वत:वर झेलला

नांदेडमध्ये जो हिंसाचार झाला त्यामध्ये अनेक पोलिस बांधव गंभीर जखमी झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या होला मोहल्ला मिरवणुकीलाही सरकारने परवानगी दिली नव्हती.

होला मोहल्लाचे शिख धर्मात विशेष महत्व आहे. हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता आणि याला गुरूद्वारा समितीनेही सहमती दर्शवली होती. मात्र काही जणांना प्रशासनाचा हा निर्णय आवडला नाही.

त्यांनी प्रशासनाचे आदेश धुडकावून लावले आणि सायंकाळी पोलिसांनी सुरक्षेसाठी लावलेली बॅरिकेटींग तोडत मोहल्ला कार्यक्रम केला. यादरम्यान पोलिसांमध्ये आणि त्या तरूणांमध्ये झटापट झाली. यावेळी जमावाने पोलिसांवर हल्ला केला आणि प्रचंड तोडफोड केली.

या हल्ल्यात चार पोलिस गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे. यावेळी हल्लेखोरांनी थेट पोलिस अधिक्षकांवरच तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्यावरील तो वार त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर झेलला.

या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती नीट व्हावी यासाठी सगळेजण प्रार्थना करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.