BMC Election : मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या पक्षाचा? पोलमध्ये 73 टक्के युजर्सचं एकमत, मराठी माणसाचा कल…

BMC Election : मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, शिवसेना (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) या दोन मराठी पक्षांच्या संभाव्य युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतदारांचा कौल पुन्हा एकत्र येणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई महापालिका ही केवळ देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून महत्त्वाची नाही, तर मराठी अस्मितेचं केंद्र म्हणूनही तिचं वेगळंच स्थान आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या यूट्यूब चॅनलवर एक जनमत चाचणी घेण्यात आली.

मुंबईतील मराठी मतदारांचा प्रभाव

मुंबई शहरात मराठी भाषिकांची लोकसंख्या कधीच ५० टक्क्यांहून अधिक राहिलेली नाही. मात्र इतर भाषिकांच्या तुलनेत मराठी मतदारांची संख्या कायमच जास्त राहिली आहे. सहा लोकसभा मतदारसंघांचा विचार केला, तर मराठी मतदारांचे प्रमाण सरासरी ४० टक्क्यांच्या आसपास आहे.

याच कारणामुळे ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद भाजप आणि शिंदे गटासाठी आव्हान ठरणार का, की ही युती निवडणुकीत निष्प्रभ ठरणार, याची चर्चा सुरू आहे. याच चर्चेला ऑनलाईन पोलमधून नेटिझन्सचा कल समोर आला आहे.

ऑनलाईन पोलमध्ये विचारलेला प्रश्न

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या पोलमध्ये थेट प्रश्न विचारण्यात आला होता. मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार? यामध्ये चार पर्याय देण्यात आले होते. २४ तासांच्या कालावधीत जवळपास २ लाख ९२ हजारांहून अधिक युजर्सनी मतदान केले, तर शेकडो जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या.

काय सांगतात पोलचे निकाल?

या पोलमध्ये शिवसेना यांच्या बाजूने तब्बल ७३ टक्के युजर्सनी कौल दिला आहे. म्हणजेच दोन लाखांहून अधिक नेटिझन्सनी मुंबई महापालिकेवर त्यांचाच महापौर बसणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष यांना १४ टक्के युजर्सचा पाठिंबा मिळाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि मनसे यांना अनुक्रमे ७ आणि ६ टक्के मते मिळाली आहेत.

मात्र, हा पोल केवळ ऑनलाईन जनमताचा अंदाज आहे, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मतदान करणारे सर्व युजर्स मुंबईतील मतदार असतीलच, असं नाही. महाराष्ट्राबाहेरून आणि परदेशातूनही अनेकांनी मतदान केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष महापालिका निवडणुकीचे निकाल आणि या पोलचे आकडे वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरीसुद्धा, मराठी मतदारांचा झुकाव सध्या कुठल्या बाजूने आहे, याचा संकेत हा पोल नक्कीच देतो, असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे.