BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC) जसजशी जवळ येत आहे, तसतसे काही वॉर्ड राजकीय रणांगणात बदलताना दिसत आहेत. मुलुंड (Mulund) येथील वॉर्ड क्रमांक 107 मध्ये भाजप नेते नील सोमय्या (Neil Somaiya) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सुरुवातीला सामना एकतर्फी होईल, असा अंदाज बांधला जात होता. कारण या वॉर्डमध्ये शिवसेना ठाकरे गट (UBT faction) कडून अधिकृत उमेदवार नसल्याची चर्चा होती, तर जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar group) आघाडीवर असल्याचं बोललं जात होतं.
मात्र राजकारणात शेवटच्या क्षणाला चित्र बदलतं, याचं जिवंत उदाहरण या वॉर्डमध्ये पाहायला मिळालं. ठाकरे गटाकडून पुरस्कृत म्हणून दिनेश जाधव (Dinesh Jadhav ) यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याचं जाहीर झालं आणि संपूर्ण गणितच बदललं. ही घोषणा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत करताच वॉर्ड 107 पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला.
“दमदाटी होणार हे आधीच कळलं होतं”
यानंतर माध्यमांसमोर बोलताना संबंधित अपक्ष उमेदवाराने गंभीर आरोपांची मालिका उघड केली. विरोधी बाजूकडून अनेकांना दबावाखाली आणण्याचे प्रयत्न झाल्याचं सांगत, “मला घाबरवण्याची कोणाचीही हिंमत नाही,” असा थेट इशारा देण्यात आला. निवडणूक प्रक्रियेत काहीतरी गडबड होणार, याची पूर्वकल्पना असल्यामुळेच अपक्ष अर्ज आधीच दाखल केला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी मतदार आणि अस्मितेचा मुद्दा
हा संपूर्ण प्रभाग मराठी भाषिकांचा असून इथल्या मतदारांचा कल स्पष्ट असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. “ही लढाई केवळ निवडणुकीपुरती नाही, तर मराठी अस्मितेची आणि हक्काच्या प्रतिनिधित्वाची आहे,” असं सांगत जनतेचा विश्वास आपल्यासोबत असल्याचा ठाम दावा करण्यात आला. धमक्या, दबाव किंवा राजकीय खेळी यांना आपण कधीच भीक घातलेली नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
आधीच तयारी का करून ठेवली होती?
निवडणूक आयोगाच्या सध्याच्या कार्यपद्धतीमुळे आणि इतर वॉर्डमध्ये सुरू असलेल्या दादागिरीच्या पार्श्वभूमीवर, एखादा अर्ज बाद होऊ शकतो किंवा मागे घेतला जाऊ शकतो, अशी शंका आधीपासूनच होती. म्हणूनच ठरावीक तारखेला अपक्ष अर्ज भरून ‘प्लॅन बी’ तयार ठेवण्यात आला होता, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
“बिनविरोध जिंकण्याचा डाव फसला”
काही अपक्ष आणि इतर भाषिक उमेदवारांवरही दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो यशस्वी झाला नाही. समोरचा उमेदवार बिनविरोध निवडून येईल, असा जो अंदाज बांधण्यात आला होता, तो पूर्णपणे चुकला. अनेक वर्षांचा स्थानिक कामाचा अनुभव, शिवसैनिकांची ताकद आणि संघटनात्मक पाठबळ यावर विश्वास ठेवूनच थेट लढतीचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.