BMC Election 2025 : मोठी बातमी: मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेने दाखवले मोठे संकेत

BMC Election 2025 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका (Mumbai BMC Election 2025) डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महायुतीत हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. नागपूरमध्ये काल उशिरा झालेल्या मॅरेथॉन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan ) यांनी एकत्र लढतीबाबत प्राथमिक चर्चा पुढे नेली. मुंबई, ठाणे आणि इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये एका पॅनेलमधून निवडणूक लढवण्याबाबत वरिष्ठ नेत्यांची भूमिका सकारात्मक असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र कुठल्या महापालिकेत राष्ट्रवादीसोबत प्रत्यक्ष युती करायची याचा निर्णय स्थानिक समिती घेणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

महायुतीची चर्चा सुरू असताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेत एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये भाजपला मोठा विरोध असून, उलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाला तिथे चांगली पसंती मिळत असल्याचं समोर आलं. या सर्व्हेनुसार मुंबईतील सुमारे 18 वॉर्डमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत आणि या वॉर्डांमध्ये भाजपऐवजी शिंदेंच्या उमेदवारांना लोकांचा कल अधिक आहे. शिंदेंच्या कुटुंबीयांचा मुस्लिम महिला मतदारांवर असलेला प्रभाव हा यामागचा एक महत्त्वाचा कारणीभूत घटक असल्याचं भाजपकडून नमूद करण्यात आलं आहे.

मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये शिंदेंना जास्त पसंती

भाजपाच्या सर्व्हेनुसार, 18 वॉर्डांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम वस्ती असणाऱ्या जागांवर भाजप स्वतः लढवण्यापेक्षा शिंदे गटाचा उमेदवार उभा राहिल्यास जिंकण्याची शक्यता जास्त आहे. तसेच 7 वॉर्डांमध्ये सुमारे 35 टक्के मुस्लिम लोकसंख्या असून, तिथेही मुस्लिम मतदार निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे या जागा एकनाथ शिंदे गटाला देण्याबाबत भाजपमध्ये फारसा विरोध नाही, अशी माहिती एका वरिष्ठ नेत्यानं दिली. यामुळे ‘एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण योजना’ प्रत्यक्षात या निवडणुकीत किती परिणामकारक ठरेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महायुतीतील त्रिकोणात नवाब मलिक अडथळा

मुंबईतील महायुती चर्चेदरम्यान अजित पवार गटातील राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वावरून तणाव वाढताना दिसत आहे. मुंबईची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे असल्यामुळे भाजपकडून तीव्र विरोध नोंदवण्यात आला आहे. भाजप सूत्रांच्या माहितीप्रमाणे, मुंबई राष्ट्रवादीचे नेतृत्व मलिक यांच्याऐवजी इतर कुणाला दिल्यास त्यांना हरकत नाही. महायुतीचा तिसरा महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सामील करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी या नेतृत्वविषयक अडथळ्यामुळे चर्चेत अनिश्चितता निर्माण झाली आहे.