भाजपवाल्यांनो तुम्ही राणेसाहेबांचा खांदा का वापरता?; भाजप नेत्यांना काँग्रेसचा सवाल 

 

 

मुंबई। भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

 

त्यावरच “भाजपवाल्यांनो तुम्ही राणेसाहेबांचा खांदा का वापरता?”, असा कडवा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला विचारत त्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

सावंत यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत आपल्या ट्विटमध्ये असे म्हणाले आहेत की, “राष्ट्रपती राजवटीची राणेसाहेबांची मागणी वैयक्तिक आहे.

 

भाजपची ती अधिकृत मागणी नाही, असं सुधीर मुनगंटीवार सांगत होते. आता तीच मागणी राणेसाहेबांनी भाजपा कार्यालयातून केली आहे. भाजपवाल्यांनो राणे साहेबांचा खांदा का वापरता?

 

खुलीआम मन की बात सांगा की तुमची लोकांना तुमचा कुटील डाव कळू तर दे”. दुसरीकडे नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

 

राणे म्हणाले, “जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही.

 

बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही. हा मुख्यमंत्री प्रशासन चालवू शकत नाही. जनतेची परिस्थिती थांबवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार घातक आहे.

 

महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. हा मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेरच पडत नाही, तो काय काम करणार. असा मुख्यमंत्री कुठे सापडणार नाही आणि कुणी ठेवणार पण नाही”, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.