Gopichand Padalkar : गेली दोन–तीन दिवस महाराष्ट्रात एकच चर्चा सुरु आहे. एका कीर्तनावरून दिलेली धमकी आणि त्याला मिळालेला राजकीय पाठिंबा. धार्मिक भाषा वापरून दिलेल्या कठोर इशाऱ्यांमुळे समाजमन हादरून गेलं असताना, आता या विधानांना थेट राजकीय आधार मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी संग्राम भंडारे (Sangram Bhandare) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना उद्देशून “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” असं जाहीरपणे कीर्तनामधून सांगितलं. हे वक्तव्य अहमदनगर जिल्ह्यातील घुलेवाडी (Ghulewadi) या गावात कीर्तन सुरू असताना करण्यात आलं. उपस्थितांपैकी काहींनी या राजकीय भाष्याला विरोध केला आणि तिथेच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणावर आता भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उघडपणे संग्राम भंडारे यांना पाठिंबा दिला आहे.
मालेगाव (Malegaon) येथे बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, संग्राम बापू महाराज समाजाला लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारख्या प्रश्नांबाबत जागं करत आहेत. त्यांची भूमिका हिंदू धर्माच्या रक्षणासाठी असल्याने आम्ही त्यांच्यामागे ठामपणे उभे आहोत. त्यांनी समाजप्रबोधनासाठी केवळ कीर्तनाचा मार्ग स्वीकारला असून हे करणे चुकीचे नाही, असा दावा पडळकरांनी केला.
त्यांनी म्हटलं की, संग्राम भंडारे यांच्या परखड बोलण्यामुळे अनेकांना धक्का बसला असला तरी त्यांच्या इशाऱ्यामुळे समाज सावध होत आहे. यालाच खरी समाजसेवा म्हणतात. जिथे जिथे उमेदवार पराभूत झाले, तिथे संग्राम बापूंबद्दल रोष ठेवला जातो, हेच त्यांची भूमिका योग्य असल्याचं प्रत्यक्ष उदाहरण असल्याचं पडळकर यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवरही टीका केली. “कीर्तन हा समाजप्रबोधनाचा पवित्र मार्ग आहे, आणि तिथे गोंधळ घालून हिंदू संस्कृतीचा अपमान करण्यात आलाय”, असंही ते म्हणाले.
संग्राम भंडारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे समाजात जागृती झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. “धर्मरक्षण हे कीर्तनातून मांडणं चुकीचं कसं असू शकतं?”, असा सवाल करत त्यांनी भंडारेंच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दिला.