सध्या अभिनेत्री विद्या बालन शेरनी या आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र आता तिच्या शुटिंगमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये तिच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यादरम्यान विद्या बालन आणि मध्य प्रदेशच्या वनमंत्री विजय शाह यांची भेट झाली.
यावेळी विजय शाह यांनी तिला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण दिले पण तिला कामामुळे ते शक्य नसल्याने तिने नकार दिला. त्यानंतर विद्याच्या शूटिंगदरम्यान अडथळा आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेटीसाठी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. यानंतर, वनमंत्री सायंकाळी चार वाजता महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाणार होते. तिथे त्यांना रात्रीचा मुक्काम करायचा होता.
अखेर विद्या आणि वनमंत्र्यांची भेट संध्याकाळी ५ वाजता झाली. त्यांनी विद्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण दिले. पण वेळ नसल्याने विद्याने नकार दिला. याचा परिणाम विद्याच्या शूटिंगवर झाला असा आरोप करण्यात येतो आहे. दुसर्या दिवशी जेव्हा शूटिंगसाठी सर्वजण निघाले होते तेव्हा त्यांच्या गाड्या रोखण्यात आल्या.
अखेर मुख्य वनसंरक्षक नरेंद्र कुमार सनोदिया यांच्या आवाहनानंतर शूटिंगला सुरुवात झाली. शूटिंगसाठी जंगलामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जनरेटर नेण्यात आले होते. म्हणून शूटिंगला परवानगी नाकारली होती. असे नंतर कळविण्यात आले.