भाजप नेते किरीट सोमय्या अडकले! चुकीची माहिती दिल्यानं प्रताप सरनाईक फौजदारी कारवाई करणार

मुंबई।भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मात्र यावेळी किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांना चुकीची माहिती दिल्यानं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे सरनाईक यांचे वकिल अमित नाडकर्णी यांनी सांगितले आहे.

किरीट सोमय्या यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन विषयावर पालिका आयुक्तांना भेटायला येणार आहे, असे ट्विट करून पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची बुधवारी भेट घेतली.

सोमय्या यांना १७ व २२ डिसेंबर २०२० रोजी आमदार सरनाईक यांनी त्यांची खोट्या माहितीच्या आधारे मानहानी केल्याबाबत नोटीस देऊन माफी मागण्याचा पर्याय दिला होता. त्यावर सोमय्या यांनी ३० डिसेंबर रोजी त्रोटक जबाब उत्तरादाखल दिला.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ७ जुलै रोजी सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटींचा नुकसानभरपाईचा दिवाणी दावा दाखल करण्यात आला. या दाव्यामध्ये कोर्टाने नोटीस काढलेली आहे. याची जाणीव असूनदेखील त्यांनी सरनाईक यांच्याविरोधात पुन्हा चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे ॲड. नाडकर्णी यांनी सांगितले.

त्यामुळे पुन्हा एकदा चुकीची माहिती दिल्यानं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे सरनाईक यांचे कायदेविषयक सल्लागार ॲड. अमित नाडकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार का याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.