BJP : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील भाजपा जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ ‘बंबम’ एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये कश्यप भाजपा कार्यालयात एका महिला कार्यकर्त्याला मिठी मारताना दिसतात. प्रकरणावर वाद निर्माण झाल्यानंतर, त्यांनी माध्यमांसमोर येत स्वतःची बाजू मांडली असून, “मी फक्त आधार दिला, मदत केली,” असं स्पष्ट केलं आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
या व्हायरल फुटेजमध्ये, एक महिला कार्यकर्ती भाजपा कार्यालयाच्या पायऱ्यांवर काही वेळ उभी असताना दिसते. काही वेळातच अमर किशोर कश्यप त्या दिशेने येतात आणि तिला मिठी मारतात. त्यानंतर दोघं वरच्या मजल्यावर जातात. दुसऱ्या एका CCTV फुटेजमध्ये, एक वाहन कार्यालयाच्या आवारात येताना दिसते. त्या वाहनातून हीच महिला खाली उतरते आणि कश्यप स्वतः गाडीचा गेट उघडून तिला आत घेतात.
कश्यप यांचं स्पष्टीकरण – ‘महिलेची तब्येत बरी नव्हती’
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अमर किशोर कश्यप म्हणाले, “ती महिला आमच्या पक्षाची सक्रिय कार्यकर्ती आहे. १२ एप्रिल रोजी तिची तब्येत बरी नव्हती. तिने मला फोन करून थोडी विश्रांती घेण्यासाठी कार्यालयात थांबण्याची विनंती केली. मी स्वतः गाडी पाठवून तिला बोलावलं.” ते पुढे म्हणाले, “पायऱ्या चढताना तिला चक्कर येत होती, म्हणून तिला पडू नये म्हणून मी फक्त तिला आधार दिला. जर एखाद्याला मदत करणं गुन्हा असेल तर मी यावर काही बोलणार नाही.” ‘आमच्याच लोकांनी व्हिडिओ व्हायरल केला.
कश्यप यांनी असा आरोप केला आहे की,
“हा व्हिडिओ भाजपा कार्यालयातीलच आहे आणि तो कोणीतरी जाणूनबुजून व्हायरल केला आहे. माझ्याच पक्षातील काही लोक यामागे असावेत, असं मला वाटतं. यामागे राजकीय हेतू असून, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
महिलेची प्रकृती आता स्थिर, विश्रांती घेत असल्याचंही कश्यप यांचं म्हणणं, अमर किशोर कश्यप यांनी सांगितलं की, “ती महिला आता बरी आहे आणि घरी विश्रांती घेत आहे. या प्रकरणात कोणताही अनुचित हेतू नव्हता, त्यामुळे यावर राजकारण करू नये.”
राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया, चौकशीची मागणी
या प्रकरणावर विरोधकांनी टीका करत भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. मात्र भाजपा गोंडा जिल्हा युनिटकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप यांच्यावरील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण पुरेसं मानायचं की या प्रकरणात आणखी तपास आवश्यक आहे, हे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर अवलंबून असेल. दरम्यान, या प्रकरणाचा राजकीय परिणाम आणि सामाजिक प्रभाव काय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
bjp-district-president-who-hugged-woman-gives-explanation






