अर्णब गोस्वामींना अटक झाल्यानंतर राज्य सरकार आणि भाजपमध्ये जुंपली

मुंबई | रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली. इंटिरिअर डिझायनर अनवय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे.

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला वेठीस धरले आहे. ते म्हणाले की, पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही म्हणून वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणाची केस २०१८ मधेच बंद झाली होती.

ती केवळ आणि केवळ सूडाच्या भावनेने उघडण्यात आली आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी ही घटना आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याआधी एक भारतीय नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करतो.

मी महाराष्ट्र जनतेला आणि आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, आपण आपल्या पद्धतीने राज्य सरकारचा आंदोलन करून विरोध करा, उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा असे पाटील यावेळी म्हणाले.

यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकार सूडभावनेने काम करत नाही. पोलिसांकडे पुरावे असले तर ते कोणावरही कारवाई करू शकतात.

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कुणाचाही आवाज दाबला जात नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर अर्णब गोस्वामी यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. याबाबतही चौकशी व्हायला पाहिजे.

जर राज्यात कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे काम पोलीस यंत्रणा करत आहे. मग ते पत्रकार, अभिनेता, वकील कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.