‘आधी घरातला अंधार दुर करा आणि मग दिल्लीला उजेड पाडायला जा’

मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात प्रहार करण्यासाठी बच्चू कडू महाराष्ट्रातून दिल्लीला रवाना झाले आहेत. राजधानी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनासाठी मंत्री बच्चू कडू मोटारसायकलने प्रवास करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी कडूंवर जहरी टीका केली आहे.

 

“केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले स्वतःच्या घरातील अंधार दूर करावा आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर मग इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी”, असा घणाघात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला.

 

तसेच, बच्चू कडूंच्या स्वत:च्या मतदरसंघातील सर्व सिंचन प्रकल्प ठप्प पडले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करून ते पळवत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा, असं आव्हान कुळकर्णी यांनी कडूंना दिलं आहे.

 

बच्चू कडू पालकमंत्री असलेल्या उमा बॅरेज, नेर धामना, पूर्णा बॅरेज, नया अंदुरा हे प्रकल्प बंद पडले आहेत. पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढत असताना राज्याच्या मंत्री मंडळात मूग गिळून गप्प बसले असल्याचंही कुळकर्णींनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा विषय पेटला आहे. विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींचीही भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

 

या एकूणच साऱ्या मुद्द्यावर भाजपाकडून कडाडून टीका केली जात आहे. यावर बच्चू कडूंची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.