“भाजपच्या नटीने मुंबईला ‘पीओके’ म्हटले, आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांला राज्याच्या विकासासाठी मुंबईत यावे लागले”

मुंबई । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून राजकारण पेटले आहे. मनसेसह शिवसेनेने यावर टीका केली आहे. मुंबईची मायानगरी उत्तर प्रदेशमध्ये हलवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा करत सामनातून योगींना लक्ष्य केले आहे.

सामनामधून योगींवर जोरदार टीका करण्यात आली आहे. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात.

हा जणू काळाने घेतलेला सूड असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा मायानगरी आपोआप निर्माण होईल, असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांची भेट घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार असल्याचे त्यांनी घोषणा केली आहे.

योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉकडाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.

या दौऱ्यावर अनेकांनी टीका केली आहे. यामध्ये मनसेने मुंबईत बॅनर लावून टीका केली होती. शिवसेनेकडून योगींचा समाचार घेण्यात आला तर काँग्रेसने देखील जोरदार टीका केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.