Bihar Election Results 2025 : बिहार (Bihar state 2025) विधानसभेच्या निकालांनंतर वातावरण पूर्णपणे राजकीय आनंदात न्हाऊन निघालं आहे. भाजपच्या (Bharatiya Janata Party) भक्कम विजयामुळे नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याआधी निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, बहुमत कुणाला मिळणार, एनडीए पुन्हा सत्तेवर येणार की महाआघाडी पलटवार करणार. अशा प्रश्नांवर चर्चा रंगली होती. मात्र निकाल जाहीर होताच भाजप 95 जागांवर आघाडीवर दिसला. यंदाच्या निवडणुकीत हा पक्ष बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला. तर दुसऱ्या क्रमांकावर जेडीयू (JDU party Bihar) असून, त्यांनी 82 जागांवर विजय मिळवला.
निवेदिता सराफ यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
भाजपचा विजय देशभर चर्चेत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही पक्षाबद्दल ठळक मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात नवा चर्चेचा विषय समोर आला आहे.
बिहार निवडणुकीनंतर आयोजित एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, “बिहारमध्ये भाजपला मिळालेला मोठा विजय पाहून मला खूप समाधान वाटतंय. कारण मी कट्टर बीजेपी आहे. त्यामुळे पक्षाच्या या यशाने मला विशेष आनंद झाला आहे.” त्यांचं हे प्रामाणिक वक्तव्य आता सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
महेश कोठारे यांनी आधीच व्यक्त केली होती भाजपप्रती प्रशंसा
दिवाळी पहाट कार्यक्रमात दिग्दर्शक-अभिनेता महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा खुला गौरव केला होता. ते म्हणाले होते, “मी मोदीजींचा भक्त आहे. मी भाजपचा भक्त आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत कमळच फुलणार आणि भाजपचा महापौर होणार.”
या विधानावर शिवसेना (Shivsena ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत थोडी टोमणेबाज टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं, “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? अशी शंका येते. कलाकारांची मतं सगळ्यांनी ऐकायची असतात, पण त्यांचे सिनेमा फक्त एका पक्षाने पाहिलेले नसतात.”