Ghanshyam Darode : मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वातून लोकप्रिय झालेल्या ‘छोटा पुढारी’ म्हणजेच घनश्याम दरोडे (Ghanshyam Darode) होय. त्यांच्या निधनाच्या अफवांनी सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. अनेकांनी त्यांच्या हार घातलेल्या फोटोसह श्रद्धांजली वाहणारे मेसेज शेअर केले. मात्र, या सर्व बातम्या खोट्या असून, दरोडे स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे समोर आले आणि “मी ठणठणीत आहे,” असं स्पष्ट सांगितलं.
व्हिडीओ शेअर करून घनश्याम दरोडे यांचे स्पष्टीकरण
घनश्याम दरोडे यांनी त्यांच्या अधिकृत (Instagram) अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत अफवांवर पूर्णविराम दिला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं, “कोणी चांगलं बोललं, कोणी वाईट बोललं. पण माणूस गेल्यावर चांगलं बोलतात, हे आज अनुभवलं. मी अजून जिवंत आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे लढतोय आणि लढत राहीन.”
‘माझं निधन झालं’ म्हणत पोस्ट टाकणाऱ्यांवर नाराजी
घनश्यामने स्पष्ट केलं की, “एका दादाने माझ्या निधनाची बातमी पोस्ट केली होती. म्हणे मला हृदयविकाराचा झटका आला. माझं असं काहीही झालेलं नाही. मी व्यवस्थित आहे. मी चालतो, बोलतो. अपघात दोन महिने आधी झाला होता, पण आता मी बरा आहे.” तसेच, अशा अफवा पसरवणाऱ्यांबाबत त्याने नाराजी व्यक्त केली आणि इतर व्यक्तींविषयी असं काही करू नका, असंही स्पष्टपणे सांगितलं.
या व्हिडीओमध्ये शेवटी घनश्याम दरोडेंच्या हार घातलेल्या फोटोचं पोस्टर दाखवण्यात आलं, ज्यावर लिहिलं होतं, “पुढाऱ्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्याला पुढाऱ्यांनी शोधून काढत वाहिली आदरांजली.” यासोबतच कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “मला श्रद्धांजली वाहणाऱ्याला शोधून काढलं!” हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी घनश्याम दरोडे यांनी (Shrigonda Police Station) येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन (YouTube) चॅनल्सवरून मुद्दामहून बदनामी करणारे व्हिडीओ पसरवण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.