Share

Sanjay Raut on Narendra Modi & Amit Shah : सप्टेंबरमध्ये मोठा राजकीय भूकंप? मोदी-शाहांच्या राष्ट्रपती भेटीनंतर संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut on Narendra Modi & Amit Shah : दिल्लीतील (Delhi) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ३) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांची भेट घेतली. काही वेळानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीदेखील राष्ट्रपतींची भेट घेतली. या दोन्ही भेटी अगदी थोड्या वेळाच्या अंतराने घडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत देशातील काही अतिमहत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून, याच पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सप्टेंबर महिन्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे म्हटलं, “आपल्या देशात राष्ट्रपतींच्या अधिकारांची मर्यादा सगळ्यांना ठाऊक आहे, आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सरकार किती निर्णय घेते, हेही आपण जाणतो. पण आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) एक महत्त्वपूर्ण बैठक आहे. माझ्या माहितीनुसार, या बैठकीतही भविष्यातील काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून सतत सांगितलं जात आहे की सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी होतील, आणि मलाही तसंच वाटतं,” असा ठाम दावा त्यांनी केला.

“ते राष्ट्रपतींना भेटायला जातात, हीच मोठी गोष्ट”

राऊत पुढे म्हणाले, “पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटणे ही त्यांच्या कामाचा भाग असतो, पण एकाच दिवशी मोदी आणि शाह भेटायला गेले हे योगायोग मानता येणार नाही. देशातील सध्याच्या परिस्थितीकडे पाहता काहीही घडू शकतं. आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं आहे.”

गडकरींच्या वक्तव्याचं कौतुक, पण भाजपवर निशाणा

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अलीकडेच गांधीजी आणि नेहरूंच्या विचारांचा उल्लेख करत रोजगार निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “गडकरी हे सरकारमधले सर्वात समजदार मंत्री आहेत. पण त्यांनी नेहरूंचं नाव घेतलं म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल की काय, अशी भीती वाटते. भाजपला नेहरूंचा किती द्वेष आहे, हे दिसतं. मुंबईतील (Mumbai) मेट्रो स्टेशनवरून नेहरूंचं नाव काढलं, सायन्स सेंटर केलं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख न करता फक्त राष्ट्रीय उद्यान म्हणतात. गडकरींच्या समजदारीला माझा सलाम आहे,” असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now