Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाला कोकणात आणखी एक मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. दापोलीचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय कदम हे आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे दुपारी हा प्रवेश सोहळा पार पडणार असून, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या उपस्थितीत संजय कदम पुन्हा शिवसेनेत दाखल होणार आहेत.
राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल
संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधताना पक्षप्रवेशाचे संकेत दिले होते. “राजकारणात कोणताही शत्रू किंवा मित्र कायमचा नसतो,” या उक्तीचा प्रत्यय आता दापोली मतदारसंघात दिसून येत आहे.
रामदास कदम आणि संजय कदम यांच्यातील राजकीय मतभेद मिटले असून, शिवसेनेच्या गडात दोन्ही कदम पुन्हा एकत्र काम करणार आहेत. याचा फायदा आगामी राजकीय समीकरणांवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
दापोलीत गेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना
संजय कदम हे ठाकरे गटाचे दापोली विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत गृहराज्यमंत्री पद मिळवले. संजय कदम यांना सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला.
संजय कदम यांची राजकीय वाटचाल
संजय कदम यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात खेड तालुक्यातील चिंचघर गावच्या सरपंच पदावरून केली. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य आणि उपाध्यक्षपदावरही कार्यरत राहिले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांचे शिवसेनेचे तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत मतभेद झाले. यामुळे त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
२०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर दापोली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
रामदास कदम आणि संजय कदम पुन्हा एकत्र
संजय कदम हे एकेकाळी रामदास कदम यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, पक्ष बदलल्यानंतर दोघांमध्ये कट्टर राजकीय वैमनस्य निर्माण झाले होते. आता शिवसेनेत पुनरागमन करताना संजय कदम आणि रामदास कदम पुन्हा एकत्र येणार असल्याने दापोली मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
कोकणात राजकीय हालचालींना वेग
ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली राजकीय धुळवड आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.