Uddhav Thackeray : राज्यात ‘हिंदी भाषा सक्ती’विरोधात वातावरण तापले असताना, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)’ कडून या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ‘शिवसेना’ सुद्धा मैदानात उतरली. या दोन्ही पक्षांकडून ५ जुलै रोजी एकत्रितपणे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने ‘त्रिभाषा सूत्र’ रद्द केल्यामुळे हा मोर्चा रद्द करून त्याऐवजी मुंबईतील एक भव्य विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक मेळाव्यात ‘मनसे’ प्रमुख ‘राज ठाकरे’ (Raj Thackeray) आणि ‘शिवसेना’ प्रमुख ‘उद्धव ठाकरे’ (Uddhav Thackeray) दोघेही एकत्रितपणे व्यासपीठावर असणार आहेत. मात्र या कार्यक्रमाआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या रविवारी, मुंबईत ‘हिंदी सक्ती’च्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान शिवसेनाच्या नेत्यांनी ‘हिंदी जीआर’ ची होळी केली होती. या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ), खासदार संजय राऊत (Sanjay Raut), मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष ‘हर्षवर्धन सपकाळ’ (Harshvardhan Sapkal) हे सहभागी झाले होते.
मात्र, या आंदोलनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे ‘आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय अभ्यास आणि कृती समितीचे सदस्य ‘दीपक पवार’ (Deepak Pawar), शिवसेना गटाचे विभागप्रमुख ‘संतोष शिंदे’ (Santosh Shinde), शाखाप्रमुख ‘संतोष घरत’ (Santosh Gharat) आणि संघटिका ‘युगेंद्र साळेकर’ (Yugendra Salekar) यांच्यासह सुमारे २५० ते ३०० आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा भारतीय न्याय संहिता च्या कलम १८९(२), १९० आणि २२३ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
सरकारने जीआर मागे घेतल्यानंतर, ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी येथील (Worli, Mumbai) डोम येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ‘राज ठाकरे’ आणि ‘उद्धव ठाकरे’ प्रथमच एकत्रितपणे उपस्थित राहणार आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर, आंदोलनात सहभाग घेतलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासाठी ही अडचण ठरू शकते.