पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला बसणार मोठा धक्का.? एक्झिट पोलचा निकाल भाजपच्या बाजूने

पंढरपूर । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके आणि भाजपकडून समाधान आवताडे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तसेच शेतकरी संघटनेकडून देखील निवडणूक लढवली गेली.

आता या निवडणुकीचा एक्झिट पोलचा निकाल सध्या समोर आला असून यामध्ये भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा पोल धक्कादायक ठरत आहे. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चिंतेत आहेत.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. राष्ट्रवादीकडून भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी उमेदवारी देण्यात आली. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजू शेट्टी मतदार संघात तळ ठोकून होते. यांच्यासह अनेक नेत्यांनी याठिकाणी सभा घेऊन वातावरण तापवले आहे. या निवडणुकीत ६६ टक्के मतदान झाले आहे.

या निवडणुकीनंतर पुण्याच्या द स्ट्रेलेमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. यामध्ये समाधान आवताडे हे 3438 मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचा पराभव झाला तर हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.

निवडणुकीत सुधाकर परिचारक कुटुंबाचाही प्रभाव असल्याचं दिसून येत आहे. परिचारक कुटुंबाने संपूर्ण मतदारसंघात ताकद लावून आवताडे यांचा प्रचार केला. निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार अधिक सक्रिय असल्याचे दिसून आले.

अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, मात्र त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या मागे उभे राहिले नसल्याचे दिसून आले. यामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. २ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.