Bhavana Gawali : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील गोरेगाव येथे काल शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासोबतच भाजपलाही धारेवर धरले. तसेच त्यांनी शिंदे गटातील अनेक नेत्यांवर जोरदार टीका केली.
शिंदे गटातील नेत्या भावना गवळी यांच्यावरही ठाकरेंनी यावेळी निशाणा साधला. भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधण्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती. “मला पंतप्रधानांचे आश्चर्य वाटते. स्वतःच्याच पक्षातील लोकांनी ज्या महिला खासदारावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप केलेत, या सव्वा-दीडशे कोटी लोकसंख्येमध्ये तुम्हाला हीच बहीण मिळाली राखी बांधायला?, अशा शब्दांत ठाकरेंनी टीका केली होती.
आता भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, गेल्या २५ वर्षांपासून माझ्या मतदारसंघातल्या जवळपास १ लाख बांधवांना मी न चुकता दरवर्षी राख्या पाठवत असते. त्यामुळे हा उपक्रम काही नवीन उपक्रम नाही. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मी ते मुख्यमंत्री असतानापासून राखी बांधते. त्यांना मी अहमदाबादला जाऊन भेटलेली आहे. तसेच त्यांना सातत्याने राखी बांधत आलेली आहे.
त्यामुळे काल उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केले, त्यामुळे माझं हृदय दुःखलं आहे. एका पवित्र बंधनाबद्दल त्यांनी वक्तव्य केले आहे. काल मी त्यांची ताई होती, आज त्यांनी बाई म्हणून माझा उल्लेख केला आहे, असे भावना गवळी म्हणाल्या. तसेच आपल्याला राजकारण करायला अनेक जागा आहेत. परंतु, हे सगळं ज्या पद्धतीने बोलल्या गेलं, त्यामुळे मी अत्यंत दुखावली गेली आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे गवळी म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कठीण परिस्थितीत सहकार्य केले आहे. मी कधीही नात्याचे भांडवल केले नाही. रक्षाबंधन हे पवित्र नातं आहे. त्या बंधनाचा आपण सर्वांनी सन्मान केला पाहिजे आणि त्यावर कुठलेही राजकारण करू नये एवढीच माझी प्रामाणिक ईच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या.
तसेच मी काहीच नवीन केलेलं नाही. याआधीही मी देशाच्या पंतप्रधानांना राखी बांधत आले आहे. परंतु, त्यावर मी कुठलेही राजकारण केले नाही. त्यामुळे कुणीही यावर राजकारण करू नये. माझ्या मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांपासून तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनासुद्धा मी राखी बांधली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तळपते सूर्य आहेत, पण त्यांचा प्रकाश मातोश्रीच्या बिळाबाहेर फार पडत नाही
BJP : २६ जुलैच्या पुरात बाळासाहेबांना एकटे सोडून स्वतः फाईव्हस्टार हाॅटेलमध्ये रहायला गेलते त्याचे काय? भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल
Gajanan Kirtikar : पुन्हा भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती करणार; शिवसेनेतील बड्या नेत्याचे वक्तव्य
Shinde Group : …तर आम्ही उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू पण ‘या’ अटीवर; शिंदे गटाची ठाकरेंना जाहीर ऑफर