Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसात शिवसेनेत अनेक उलथापालथी झाल्या आहेत. पक्षात फूट पडण्यापासून तर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. या सगळ्यातून शिवसैनिकांना उभारी मिळावी आणि त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात आली आहे.
या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाषण केले. यावेळी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी अतिशय भावनिक भाषण केले. आज उदभवलेल्या परिस्थितीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात मी पहिल्यांदा अश्रू पाहिले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, कोजागिरी पौर्णिमा सगळे उत्साहात साजरी करत असतात. पण, आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रातल्या जनतेच्या एका डोळ्यात अश्रू आहे, तर एका डोळ्यात आनंद, संताप, चीड आणि राग आहे. आज या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ४० गद्दारांनी शिवसेनारूपी दूध नासवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात चीड आहे, असे ते म्हणाले.
तसेच धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलेलं आहे हे ऐकून मला फार वाईट वाटलं. १९ जून १९६६ साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. आज हे शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरेंवर इतक्या वर्षात अनेक संकटे आलीत, परंतु ते कधीच खचले नाहीत. मात्र, आता उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात मी पाणी बघितलं. मला काहीही झालेलं नाही असे वरवर उद्धव साहेब दाखवत होते पण त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्यांच्या बाजूला रवी म्हात्रे उभे होते, त्यांचाही बांध फुटला, असल्याचे त्यांनी सांगितले.
रवी म्हात्रे म्हणाले, बाळासाहेब देवाची पूजा करत असताना धनुष्यबाणाचीही पूजा करत होते. आज धनुष्यबाण गोठवल्यामुळे आमच्या डोळ्यात पाणी आलं, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले. तसेच आज भाजपच्या नादाला लागून या गद्दारांनी शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षसुद्धा अडचणीत आणला आहे, असेही ते म्हणाले.
हा प्रसंग सांगून भास्कर जाधव यांनी उपस्थित शिवसैनिकांना रडवले. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही भाजप आणि शिंदे गटावर अनेक टीका केल्या. मात्र, भास्कर जाधवांच्या भाषणामुळे सर्व शिवसैनिक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या
रामदास कदमांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा, त्यांची वैचारिक पातळी.., भास्कर जाधव भडकले
ramdas kadam : राष्ट्रवादीत प्रवेश मिळावा म्हणून रामदास कदमांनी माझे पाय धरले होते; भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसणारे भास्कर जाधव भाजप मंत्र्यांच्या गाडीत, वाचा नेमकं प्रकरण काय?
तुम्हाला कोण मातोश्रीवर बोलवायला आलंय, कुणी तुम्हाला थारा दिलाय; भास्कर जाधवांनी शिंदे गटाला झापले