Share

Bharti Prataprao Pawar : पवार कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील प्रमुख सदस्याचे निधन, सुप्रीया सुळे गहिवरल्या

Bharti Prataprao Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाऊजाई आणि ‘सकाळ’ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी, भारती प्रतापराव पवार (वय 77) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी (ता. 18) दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती प्रतापराव पवार, मुलगा आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल, तसेच मुलगी अश्विनी व नातू झाकीर असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

सामाजिक कार्यात पुढाकार

मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती पवार यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्या मंदिरात झाले, तर रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतील पदवी पूर्ण केली. चित्रकलेत विशेष प्राविण्य असल्याने त्यांनी या क्षेत्रात उच्चशिक्षण घेतले. 22 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्यासोबत विवाह झाला.

पुण्यात आल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. औंध येथील बालकल्याण संस्थेत त्या 35 वर्षे कार्यरत होत्या आणि त्या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही जबाबदारी पार पाडत होत्या. तसेच, ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेच्या उपक्रमांमध्येही त्यांचा मोलाचा वाटा होता.

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

भारती पवार यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. “त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांच्या असंख्य आठवणी मनात घर करून आहेत. आम्हा सर्व भावंडांवर त्यांनी भरभरून प्रेम केले. त्यांची प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील,” असे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केले.

खासदार सुनेत्रा पवार यांनीही आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. “भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने भरून आले. त्यांनी संपूर्ण पवार कुटुंबावर निस्वार्थ प्रेम केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,” अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली.

भारती पवार यांच्या निधनाने समाजसेवा आणि कलेच्या क्षेत्रातील एक समर्पित व्यक्ती हरपली आहे. त्यांच्या कार्याचा ठसा कायम राहील.

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now