Share

Bharat Gogawale: हरिहरेश्वराला भरत गोगावले यांचा नवस ; “विधानसभेला चुकीचं काम करणाऱ्याचं वाटोळं होऊ दे”

Bharat Gogawale: रायगडमधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) आणि शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. नेत्यांकडून एकमेकांना देवासमोर फुल उचलण्याचे आव्हान दिले जात असताना, आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी हरिहरेश्वरात नवस करून वादाला नवे वळण दिले आहे. विधानसभेच्या वेळेस ज्यांनी “जाणूनबुजून चुकीचं काम” केलं, त्यांचा सत्यानाश होऊ दे, असे ते म्हणाले. या वक्तव्यावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर निशाणा साधल्याचं स्पष्ट दिसतं.

श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोगावले म्हणाले, “जर आम्ही कुणाच्या विरोधात चुकीचं वागलो असेल, तर आमच्यावर शिक्षा यावी. पण विधानसभेला आमच्याच विरोधात काम करणाऱ्याला देव धडा शिकवो. हरिहरेश्वरात मी नवस केला आहे. ज्याने चुकीचं कर्म केलं, त्याचं वाटोळं होऊ दे, त्याचा सत्यानाश होऊ दे.”

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील मतभेद रायगडच्या पालकमंत्रिपदापासून सुरू झाले आणि आता देवासमोरची फुले उचलण्याच्या आव्हानापर्यंत पोहोचले आहेत. दोन्ही बाजूंकडून आरोपांची आणि प्रतिआरोपांची मालिका चालूच आहे.

काही दिवसांपूर्वी रोह्यातील कार्यक्रमात भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, “लोकसभा निवडणुकीत आम्ही तटकरेंची इमानदारी राखली, पण विधानसभेला त्यांनी आम्हाला फसवलं.” या आरोपाचं सत्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी सुनील तटकरेंना महाडमधील विरेश्वर महाराज (Vireswar Maharaj) मंदिर किंवा रोह्यातील धावीर महाराज (Dhavvir Maharaj) मंदिरातील फुल उचलण्याचं आव्हान दिलं होतं.

हे आव्हान स्वीकारत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) म्हणाले की, “आम्ही फूल उचलायला पूर्ण तयार आहोत. आवश्यकता भासली तर नारळ ठेवायलाही हरकत नाही. विधानसभेत आम्ही भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्यासाठी काम केले होते. पण काही जणांनी खोटं चित्र रंगवण्याचं काम केलं. हेही सत्य आहे.”

 

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now