Homeताज्या बातम्याभाकर दे म्हंटल्यावर सुनेनं सासूची मोडली बोटं, नवरा मध्ये आल्यावर त्यालापण दिली...

भाकर दे म्हंटल्यावर सुनेनं सासूची मोडली बोटं, नवरा मध्ये आल्यावर त्यालापण दिली चापट

घरातील सासू-सुनेचा वाद ही काही नवीन गोष्ट नाही. पण क्षुल्लक कारणावरून सासू-सुनेमध्ये झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत गेल्याच्या घटना क्वचितच पाहायला मिळतात. अशीच एक घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा या गावात घडली आहे. सासू भाकर करून दे म्हणाली म्हणून सुनेनं हात-पाय मोडेपर्यंत मारहाण केल्याची घटना हिवरखेड्यात घडली आहे.

याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चंद्रकला राठोड ( वय ६० ) या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा या गावात राहतात. त्यांनी कन्नड शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, घरात असताना त्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच छाया राठोड हिला मी जेवण केलं नसल्यामुळे मला दोन भाकऱ्या टाकून काहीतरी भाजी करून दे म्हंटल.

त्यावर सून छाया राठोड यांनी आपल्या सासू चंद्रकला यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर सुनेने सासूच्या डोक्यात बुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे सासू चंद्रकला यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. त्यावर सुनेने त्यांच्या गालावर चापट मारत त्यांच्या डाव्या हाताचे बोट पिरगळून मोडले, असा आरोप सासू चंद्रकला राठोड यांनी केला आहे.

आपल्या सुनेच्या विरोधात केलेल्या पोलीस तक्रारीत चंद्रकला यांनी म्हटलं आहे की, सून माझ्यासोबत भांडण करत असताना आणि मला मारहाण करत असताना माझा मुलगा किरण राठोड मध्यस्थी करण्यासाठी त्या ठिकाणी आला असता त्यालाही सून छाया राठोड यांनी चापट-बुक्यांनी मारहाण केली.

सासू चंद्रकला राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सून छाया राठोड यांच्याविरोधात कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलं असून, या प्रकरणात सून छाया राठोड यांना अटक करण्यात आली आहे. कन्नड शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

क्षुल्लक कारणावरून सुरु झालेला सासू सुनेचा वाद थेट हाणामारीपर्यंत आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात गेल्यामुळे संपूर्ण हिवेरखेडा गावात याच घटनेची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा सासू-सुनेच्या मारहाणीच्या अनेक घटना समोर येत आहेत.

महत्वाच्या बातम्या:-
…आणि आयुक्तांना पाहून फुल विक्रेत्या महिलेचा मुलगा म्हणाला, ‘ए आई उठ ना गं, बघ सर आलेत’
बिपीन रावत यांचा अपघात चीनने नाही, तर…; हेलिकॉप्टर अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! विशाल निकमने विकास पाटीलसोबत घेतले ज्योतिबाचे दर्शन, पहा फोटो