BEST Election Result: बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव, भाजपने खिल्ली उडवली, म्हणाले, ‘दोन शून्यांची बेरीज…’

BEST Election Result : पावसाचा मोसम जसा जोर धरू लागला तसंच मुंबईत (Mumbai city) राजकारणाचं वातावरणही चांगलंच तापलेलं दिसतंय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांनी एकत्र येत उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही बंधूंना भीषण पराभव मिळाल्याने त्यांच्या आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार हे स्पष्ट झालं आहे.

मध्यरात्री उशिरा निकाल जाहीर झाला आणि त्यात एकाही जागेवर उत्कर्ष पॅनलला यश मिळालं नाही. या पराभवामुळे शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) तब्बल ९ वर्षांपासून असलेली बेस्ट पतपेढीमधील सत्ता गमावली आहे. विशेष म्हणजे पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) पार्श्वभूमीवर हा पराभव मोठा धक्का मानला जातोय.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी सोशल मिडीयावर टीका करत, “दोन शून्यांची बेरीज कितीही केली तरी उत्तर शून्यच येतं, हे साधं गणित असूनसुद्धा त्यांना उमगलं नाही,” अशा शब्दांत टोला लगावला. याच धाटणीची खिल्ली प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीदेखील उडवत “२१ जागांपैकी एकही जिंकता आली नाही, म्हणजे ब्रँडची किंमत आता लोकांना कळाली” असं म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला.

निकालाच्या आकडेवारीनुसार एकूण २१ जागांपैकी शशांकराव पॅनेल (Shashankrao Panel) ने १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे भाजप समर्थीत सहकार समृद्धी पॅनेल (Sahakar Samruddhi Panel) ज्यामध्ये प्रसाद लाड, नितेश राणे (Nitesh Rane), किरण पावसकर (Kiran Pawaskar) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या संघटनांचा समावेश होता, त्यांनी ७ जागांवर यश मिळवलं. मात्र उत्कर्ष पॅनेल (Utkarsh Panel) ज्यामध्ये मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना आणि शिवसेना ठाकरे गटाची बेस्ट कामगार सेना यांची युती होती, त्या पॅनेलला कोणतीही जागा मिळवता आली नाही.

या पराभवानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून बऱ्याच जणांच्या मते ही निवडणूक राहिलेल्या वर्षातील पुढील शहरातील राजकीय घडामोडींसाठी संकेत देणारी ठरणार आहे.