Share

Beed : मोठा भांडाफोड! माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांना 6 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची धडक कारवाई

Beed : बीड जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) नगरपालिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथे कार्यरत असलेले मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण (Chandrakant Chavan) यांना तब्बल 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau) अर्थात एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील एसीबी विभागाने केली असून, या घटनेने संपूर्ण माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे.

12 लाखांची लाच मागणी

प्राथमिक माहितीनुसार, माजलगाव नगरपालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांबाबत ठेकेदाराने तक्रार केली होती. नगर उत्थान अभियान योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयांच्या बिलाच्या मंजुरीसाठी चव्हाण यांनी 3 टक्के म्हणजेच 6 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समजते. यासोबतच अतिक्रमण हटवणे आणि अडथळे दूर करून कामास मदत करण्यासाठी आणखी 6 लाखांची मागणी त्यांनी केली होती. एकूण 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल करताच सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे, चंद्रकांत चव्हाण यांनी त्यांच्या राहत्या घरीच 6 लाखांची रक्कम स्वीकारली, आणि त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

घराची झडती

पकडल्यावर, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या घराची झडती घेतली. यानंतर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात (Majalgaon City Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता प्रबळ झाली आहे.

मुख्याधिकारी पकडले गेल्यानंतर माजलगाव शहरात प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. सार्वजनिक पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे लाच स्वीकारली जात असल्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात लाचखोरी प्रकरणांमध्ये एसीबीकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. अशाच प्रकारे अडकलेल्या शासकीय अधिकाऱ्यांमध्ये आता माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांचंही नाव समाविष्ट झालं आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now