Share

Beed Agriculture Success Story : काय सांगता? दुष्काळी आष्टीत खजूरचं उत्पादन सुरू! दीड एकरातून तब्बल 12 लाखोंची उलाढाल, जाणून घ्या कशी केली शेती…

Beed Agriculture Success Story: बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुका म्हणजे कायम पाण्याच्या टंचाईने त्रस्त, पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल. पण केळसांगवी (Kelsangvi) गावातील दत्तात्रय घुले (Dattatray Ghule) या शेतकऱ्याने वाट बदलली. पारंपरिक शेती सोडून खजूराचं पीक घेतलं आणि अवघ्या दीड एकरातून तब्बल १२ लाखांचं उत्पादन मिळवलं. त्यांचा हा प्रयोग आता इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरतो आहे.

दीड एकरात ८० खजूर झाडं, उत्पन्न दणक्यात!

दत्तात्रय घुले यांनी आपल्या दीड एकरात ८० खजूर झाडांची लागवड केली. प्रत्येकी २५ बाय २५ फूट अंतरावर झाडं लावली गेली. एक झाड २०० किलोपर्यंत फळं देतं आणि एका झाडावरून १० ते २० हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं. ‘बरई’ (Barhee) जातीचे खजूर त्यांनी निवडले, जे गोडसर आणि दिसायला आकर्षक असतात. दीड एकरात त्यांनी आधुनिक सिंचन प्रणाली, योग्य खत व्यवस्थापन आणि झाडांची निगा राखून या फळपिकाला आकार दिला.

कमी पाण्यावर भरघोस उत्पादन

खजूर हे पीक कमी पाण्यावरही तग धरतं, त्यामुळे आष्टीसारख्या दुष्काळी भागात देखील यशस्वी होतं. त्यांनी लागवड करताना टिश्यू कल्चर पद्धतीने मिळणाऱ्या झाडांसाठी ४३५० रुपये प्रति रोप खर्च केला. सुरुवातीला अडचणी आल्या, पण चिकाटी आणि प्रयत्नाने यश मिळालं. त्यांची बाग आज राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे.

राज्याबाहेरही विक्री, शाश्वत उत्पन्नाची हमी

सध्या बागेत खजुराचा तोडा सुरू असून, राज्यातील वेगवेगळ्या भागांबरोबरच परराज्यातही याची विक्री होते. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना खजूर शेती हा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास घुले व्यक्त करतात. गुजरात (Gujarat), राजस्थान (Rajasthan) या राज्यांत खजूर शेतीसाठी शासन अनुदान देते. अशाच योजनांची गरज महाराष्ट्रातही असल्याची त्यांची मागणी आहे.

कृषी अधिकाऱ्यांचेही कौतुक

या यशस्वी प्रयोगाचं कौतुक आष्टीचे कृषी अधिकारी गोरख तरटे (Gorakh Tarte) यांनी केलं. त्यांच्या मते, दुष्काळी भागात कमी पाण्यावर तग धरणारी फळपीकं जसं की खजूर आणि ड्रॅगन फ्रुट ही शाश्वत उत्पन्नाची हमी देऊ शकतात. पारंपरिक शेतीत अडकून पडण्यापेक्षा फळबाग शेतीकडे वळाल्यास शेतकऱ्यांचं आर्थिक भवितव्य उजळू शकतं.

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now