‘सावधान! राज्यातील एटीएम बनताय कोरोना संसर्गाची ठिकाणे’

 

कळंबोली | राज्यात कोरोना संकटाचे सावट कमी होत नाही, अशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आता अनेक सार्वजनिक ठिकाणे ही कोरोना संसर्गाची केंद्रे बनत चालली आहे.

आता तर एटीएमही कोरोना संसर्गाची ठिकाणे बनत चालली आहे. कोरोना काळात पनवेल परिसरातील एटीएम सुरक्षितता काहीच नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे.

पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरातील मोजके एटीएम सोडले तर बहुतांश एटीएमला सुरक्षा रक्षक नाही, तसेच त्याठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला जात नाही.

नेहमीच स्वच्छतेचा अभाव असल्याने एटीएम केंद्रातून कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. यामुळे एटीएमकडे संबंधित बँकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच या क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे पालिकेकडून वारंवार खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जात आहे.

या पालिका क्षेत्रात स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, आयडीबीआय यांसारख्या राष्ट्रीय कृत बँक, तसेच अर्बन बँक आणि खाजगी बँकांचे एटीएम केंद्रे आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.