Share

Baramati Crime : बारामती हादरली! “माझ्या जागेत बाथरूम का बांधलं?” जाब विचारताच काका अन् भावाने केली जबर मारहाण, 24 वर्षीय तरूणाचा मृत्यू

Baramati Crime : बारामती (Baramati) तालुक्यातील पारवडी (Parwadi) येथील इंगळे वस्तीवर काल रात्री घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. केवळ “माझ्या जागेत बाथरूम का बांधलं?” असा जाब विचारल्यामुळे 24 वर्षीय तरुणाला काका आणि चुलत भावाकडून बेदम मारहाण झाली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मारहाणीची भीषण घटना

मृत तरुणाचं नाव सौरभ विष्णू इंगळे (Saurabh Vishnu Ingle) असं आहे. काल रात्री दहाच्या सुमारास त्याने कुटुंबातील प्रमोद रामचंद्र इंगळे (Pramod Ramchandra Ingle) आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे (Ramchandra Jagannath Ingle) यांना त्यांच्या वस्तीवर जाऊन, “माझ्या जागेत बाथरूम का बांधलं?” असा प्रश्न विचारला. या किरकोळ वाटणाऱ्या वादाचं थोड्याच वेळात भांडणात रूपांतर झालं. भांडणादरम्यान प्रमोद आणि रामचंद्र या दोघांनी मिळून सौरभवर झोडपाझोड केली.

पोलिस ठाण्यात दिली उलट फिर्याद

धक्कादायक म्हणजे, मारहाण केल्यानंतर आरोपी बापलेक थेट बारामती तालुका पोलीस ठाण्यात गेले आणि सौरभविरोधात फिर्याद दाखल करून आले. मात्र, त्याचवेळी गंभीर अवस्थेत असलेला सौरभला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

मृत्यूपूर्वीची माहिती पोलिसांना

सौरभला मारहाण होत असल्याची माहिती त्याने स्वतः पोलिसांना दिल्याचंही समोर आलं आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.

ही घटना कळताच पारवडीसह बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. केवळ शौचालयाच्या वादातून एका तरुणाचा जीव गेला, यामुळे ग्रामस्थांमध्ये चीड आणि संताप पसरला आहे. पोलिसांनी प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now