Balasaheb Thorat: संगमनेर (Sangamner) परिसरात एका कीर्तनमंचावरून जे घडलं, त्याने महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे आणि महायुतीची बाजू घेणारे कीर्तनकार संग्राम भंडारे (Sangram Bhandare) यांनी थेट बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर टीका करत, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” अशी धमकी दिली. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला असून यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
शनिवारी रात्री घुलेवाडी (Ghulewadi) गावात सुरू असलेल्या कीर्तनात भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्व आणि राजकारणावर भाष्य केलं. त्यांच्या भाषणावर काँग्रेसविचारधारेचे कार्यकर्ते आक्षेप घेताच, कार्यक्रमात गोंधळ झाला. नंतर भंडारे यांना मारहाण झाल्याचं पोलिसांत नोंदवण्यात आलं.
थोरातांच्या कार्यकर्त्यांवर आरोप
या प्रकरणी निषेधासाठी झालेल्या आंदोलनात अमोल खताळ (Amol Khatal) या शिंदे गटाच्या आमदारासोबत तुषार भोसले (Tushar Bhosale) या भाजपच्या अध्यात्मिक सेलच्या प्रमुखांनीही सहभाग घेतला. मारहाण करणारे कार्यकर्ते हे थोरात यांचे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर भंडारे यांचा धमकीचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला असून, थेट “बाळासाहेब, आम्हाला नथुराम व्हायला लावू नका” अशी घोषणा त्यांनी सार्वजनिकपणे केली. त्यामुळे आता थोरात आज पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
वडेट्टीवार यांचा सवाल
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गंभीर स्वरात प्रश्न उपस्थित केला आहे. “प्रवचन करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी गोडसेसारखी भाषा योग्य का?” त्यांनी स्पष्ट केलं की, समाजात विघातक वृत्तींविरोधात बोलणाऱ्या थोरात यांना उघड धमकी मिळणं हे चिंताजनक आहे.
गृहमंत्र्यांना उद्देशून त्यांनी विचारलं की, “राज्यात अजूनही पोलिसांचा धाक आहे की नाही?” कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघड मारण्याची धमकी देणार, गुन्हे दाखल करण्याची भाषा वापरणार – हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मर्यादाच पार करणं आहे, असं ते म्हणाले.Balasaheb Thorat:
सत्यजीत तांबेंची टीका
या वादात सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनीही स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. त्यांनी म्हटलं की, विरोधकसुद्धा बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना शब्द जपून वापरतात. मात्र, स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या विषयी वापरलेली उध्दट भाषा ही कोणत्याही वारकरी परंपरेतील कीर्तनकाराला मान्य होणार नाही.
ते पुढे म्हणाले की, संगमनेर हे शिक्षण, सहकार, कृषी, आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहे. आज तिथल्या सहकारी बँकांमध्ये 7000 कोटींच्या आसपास ठेवी आहेत, दररोज 9 लाख लिटर दूध निर्मिती होते, आणि केवळ दोन गावांतून 7 लाख अंडी तयार होतात. पर्जन्यछायेचा भाग असलेला हा तालुका निळवंडे धरणामुळे आज 24 तास स्वच्छ पाण्याने समृद्ध आहे.
हे यश केवळ बाळासाहेब नव्हे, तर त्यांच्या वडिलांनी – भाऊसाहेब थोरात (Bhausaheb Thorat) यांनीही उभं केलं आहे. अशा ठिकाणी एखाद्या प्रवचनकाराने राजकीय हेतूने सामाजिक विष कालवणं हे गंभीर आहे आणि संगमनेरची स्वाभिमानी जनता हे सहन करणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.