बाळासाहेब ठाकरे नाराज असत तेव्हा खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके

आज दादा कोंडके यांचा वाढदिवस. बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके तसेच दादा आणि शिवसेना यांच्‍यात एक खास नाते होते. बाळासाहेबांचे मराठी विषयाचे प्रेम आणि रसिकता यामुळे त्‍यांच्‍यात आणि दादांमध्‍ये विशेष जवळीक होती.

एकदा दादा कोंडके यांचा चित्रपट मुंबईमध्‍ये लावण्‍यात यावा यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ‘मराठा मंदिर’ वर राडा करण्‍याचा आदेश सोडला होता.

दादा कोंडके यांचा आज जन्‍मदिवस आहे. त्‍यानिमित्‍त बाळासाहेब आणि दादा कोंडके यांच्‍यातील हा किस्सा आपण जाणून घेऊयात. दोन तलवारी एकाच म्यानात फार काळ राहात नाहीत, असे म्हणतात. पण अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री याला अपवाद ठरली. दोघेही आपापल्या क्षेत्रात बाप.

लेखक, नाटककार वसंत सबनिस लिखीत ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत होते. दरम्यान, दादांनी स्वत: चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सोंगाड्या या चित्रपटाची निर्मिती केली.

त्या काळात मराठी माणूस चित्रपट सृष्टीत असला तरीही, त्यावर अधिराज्य होते ते हिंदी भाषकांचेच. त्यामुळे मराठी माणसाचे बॅनरवाले चित्रपट वगळता इतरांचे चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा नकार असे. त्यात ‘सोंगाड्या’ हा दादांचा पहिलाच चित्रपट.

दादांना चित्रपट प्रदर्शित करण्याचा ना अनुभव होता ना त्यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे ‘कोहिनूर’ चित्रपटगृहाच्या मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. त्यावेळी ‘तिन देवियां’ हा चित्रपट ‘कोहिनूर’ला लागला होता.

दादांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर न मिळाल्यामुळे रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता. दादांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

मराठी माणसाचा चित्रपट प्रदर्शित करायला थिएटरमालक नकार देतो. ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली. बाळासाहेबांनी आदेश दिला आणि पुढे शिवसैनिकांनी जो राडा केला की थिएटरमालक नमलाच. पुढे दादांचा चित्रपट तिथेच झळकला व भरपूर चालला.

तेव्हापासून दादांनी अखेरपर्यंत मागे वळून कधीच पाहिले नाही. दिवसेदिवस दादांच्या यशाची कमान चढतीच राहिली.

मराठी रसिकांनी दादांवर भरभरून प्रेम केले. बाळासाहेबांच्या आदेशाने ‘सोंगाड्या’ ‘कोहिनूर’ला झळकला त्या दिवसापासून दादा, शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाते घट्ट झाले. इतके की, बाळासाहेब जेव्हा नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके.

बाळासाहेबांनीही दादांची मैत्री अखेरपर्यंत सांभाळली. इतकी की दादांचे निधन झाल्यावर बऱ्याच वर्षांनी शिवतिर्थावर अखेरचे भाषण करतानाही बाळासाहेबांनी दादा कोंडके यांची आठवण काढली होती.

महत्वाच्या बातम्या
कोरोनात लाखो कमवलेल्या या ड्रायव्हरचं मार्केटींग बघून बडे मार्केटींग गुरू तोंडात बोट घालतील
या नागरीकांना मिळणार नाही कोरोना लसीचा दुसरा डोस; सरकार लसीकरणाची रणनिती बदलण्याची शक्यता
प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन; कोरोनाच्या उपचारादरम्यान आला हृदविकाराचा झटका
धक्कादायक! कोरोना रुग्णाला फक्त २५ किलोमीटर नेण्यासाठी रुग्णवाहिका चालाकाने घेतले ४२ हजार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.