मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचे बच्चू कडूंनी केले कौतुक अन् मानले आभार!

अमरावती | राज्यातील शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे योजना सुरु केल्याबद्दल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. किसान रेल्वे योजना ही चांगली संकल्पना आहे. त्यामुळे अगदी ९० टक्के नाही पण किमान १० टक्के तरी फायदा हा शेतकऱ्यांना होईल.

शेतकऱ्यांच्या शेतमालाची राज्य व राज्यबाहेर विक्री करण्यासाठी ही योजना आखली होती. तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने देशातील पहिली किसान रेल्वे दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ते बिहार राज्यापर्यत रेल्वे सुरू झाली आहे. नाशिकमधून सुरू झालेल्या या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक सोपी होणार आहे. असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

पण त्याचबरोबर, मराठवाडा, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र ,आणि कोकण या भागांतूनही एक-एक किसान रेल्वे सरकारने सुरू करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली.

जर प्रत्येक भागातून अशी रेल्वे सेवा सुरू झाली, तर शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पात कृषी आणि नाशवंत उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी किसान रेल्वेची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनुसार राज्यातील देवळाली ते दानापूरपर्यंतची पहिली किसान पार्सलगाडी सुरु झाली आहे.

भुसावळ रेल्वे मंडळ विभागातून ही गाडी सुरु करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या माध्यमातून चांगले बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कौतुकही बच्चू कडूंनी यावेळी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.