Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुस्लिम समाज, ऐतिहासिक व्यक्ती, तसेच पाकिस्तानविरोधात टीकेची झोड उठवली. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
“बाबर-औरंगजेबासारख्या औलादींचा उल्लेख; मदरशांवर सवाल”
सनातन संस्कृती महोत्सवात बोलताना बाबा रामदेव म्हणाले, “बाबरसारख्या नालायक औलादींनी, औरंगजेबासारख्या क्रूर लोकांनी भारतात पाय ठेवले. आज त्यांच्या वंशजांची संख्या वीस कोटींवर पोहोचली आहे.” त्यांनी असा आरोप केला की, “परदेशी निधीच्या आधारे देशात ३ लाखांपेक्षा जास्त मदरसे उभारण्यात आले.” त्यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की, “जर ते मदरसे आणि मशिदी उभारू शकतात, तर आपण गुरुकुल उभारायला हवे.”
मुस्लिम देशांवरही टीका
रामदेव यांनी मुस्लिम देशांवरही निशाणा साधला. “तुर्कस्तानसारख्या देशांना कोणताही दर्जा नाही, पण ते इस्लामचा जोरात प्रचार करत आहेत. त्यांच्या दृष्टिकोनात राष्ट्रवाद हा धर्म नसून इस्लामच सर्वकाही आहे,” असे ते म्हणाले.
पाकिस्तानवर जोरदार हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बोलताना, रामदेव यांनी पाकिस्तानवरही जोरदार हल्ला चढवला. “पाकिस्तान आतूनच कोसळत आहे. युद्ध झाल्यास ते चार दिवसही टिकणार नाही. लवकरच कराची आणि लाहोरमध्ये गुरुकुल सुरू करू. बलुचिस्तानमध्ये लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरपेक्षा तिथली परिस्थिती अधिक गंभीर आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ
बाबा रामदेव यांच्या या विधानांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांच्या या भाषणाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत यावरून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
baba-ramdev-is-once-again-in-the-news-for-his-controversial-statements