Share

बायकी टोमणे मारण्यात बाप से बेटा सवाई दिसतोय; चित्रा वाघ यांचा आदित्य ठाकरेंना टोला

राज्यातील मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावर भाजप देखील राज्य सरकारवर आक्रमक झालेली दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेवर टीका करत, बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याला प्रतिउत्तर देत, १८५७ च्या लढ्यातही फडणवीसांचे मोठे योगदान असल्याचा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

मात्र यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये “१८५७ च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल इति आदित्य ठाकरे. बाकी बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से बेटा सवाई दिसतोय” असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. सध्या चित्रा वाघ यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेला भाजपाने पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी खुलेआम या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे मनसेसोबत भाजप देखील राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहे. अशातच मुंबईतील बुस्टर सभेत बोलताना, बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना, “१८५७ च्या लढ्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा, या वादात जाण्यापेक्षा राम मंदिर बाबत कोर्टाने निकाल चांगला दिला आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे.” असे आदित्य ठाकरे यांनी म्हणले आहे.

आता त्यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी ठाकरेंवर ही मोठी कारवाई केली आहे.

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी अटी व नियमांचे पालन न केल्यामुळे तसेच प्रक्षोभक भाषण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now