आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान ठेवा, पवारांविषयी चुकीचे बोलल्यानंतर बापटांनी कार्यकर्त्याला झापले

पुणे । पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी भाजपच्याच कार्यकर्त्याला चांगलेच खडसावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मिडीयावर चुकीच्या भाषेत पोस्ट या कार्यकर्त्याने लिहिली होती. यामुळे या कार्यकर्त्यांला गिरीश बापट यांनी जाहीरपणे झापले आहे.

अशा पद्धतीने टीका करणे आपल्या पक्षाच्या संस्कृतीत बसत नाही. आपण कुणावर आणि कोणत्या भाषेत टीका करतो, याचे भान बाळगावला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे याची पुण्यात चर्चा सुरू आहे. यामुळे चुकीचे लिहिणे या कार्यकर्त्याच्या अंगलट आले आहे.

याबाबत गिरीश बापट म्हणाले की, सोशल मिडीयावर या कार्यकर्त्याची पोस्ट पाहिली व दुःख झाले. ज्येष्ठ नेते पवार यांच्या संदर्भात त्यांनी जे लिहिले आहे ते अत्यंत चुकीचे व आपल्या संस्कृतीला न शोभणारे आहे. मतभेद चांगल्या भाषेत व्यक्तही करता येतात. त्याला कोणाचीही हरकत नसते.

असे असताना महाराष्ट्रातल्या दंगलीवर शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया यावर सगळे सहमत असतील असे नाही. त्यांचे ते वैयक्तिक मत असू शकते. कार्यकर्त्यांनी आपण कोणाबद्दल बोलतो याचे भान ठेवावे. हे सर्वांना बंधनकारक आहे, असेही बापट यांनी म्हटले आहे.

तसेच शरद पवार यांना काही राजकीय उत्तर भाजपाला द्यायचे असेल तर भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व किंवा भाजपाचे महाराष्ट्र नेतृत्व जरूर उत्तर देईल. अशा पद्धतीने उत्तर देणे हे चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत मी जाहीरपणे मांडतो. आपल्या उंचीप्रमाणे व कार्य क्षेत्राप्रमाणे काम करावे सगळ्या देशाची व राज्याची जबाबदारी आपल्यावर नाही.

माझ्यासारखा कार्यकर्ता ही पथ्य पाळतो आहे. म्हणून भाजपाच्या या कार्यकर्त्याने चुकीच्या पद्धतीने मांडणी केलेल्या पोस्टचा मी निषेध करतो, असे खासदार बापट यांनी लिहिले आहे. गिरीश बापट यांची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.