Avinash Narkar : ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर(AVINASH NARKAR) हे गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमी, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण करत आले आहेत. त्यांची आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची जोडी नेहमीच प्रेक्षकांची लाडकी राहिली आहे. आजच्या डिजिटल युगात दोघंही सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत.
नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत अविनाश नारकर(avinash narkar) यांनी त्यांच्या करिअरमधील आणि आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यातली एक खास आठवण होती, ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीची.
नारकर यांनी ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत साकारलेल्या शहाजी महाराजांच्या भूमिकेचं कौतुक खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी केल्याचं ते सांगतात. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिकेत शहाजी महाराज कोणी साकारलेत? फार अप्रतिम काम केलंय त्या माणसाने,” असं बाळासाहेब(balasaheb thackrey) म्हणाल्याची माहिती मिळताच, अविनाश नारकर थेट त्यांची भेट घेण्यासाठी गेले.
त्यांनी बाळासाहेबांपुढे आपल्या नाटकातील एक जोशपूर्ण संवाद सादर केला. तो संवाद होता:
“लढेन मी शस्त्रानेच पण शस्त्र विवेक न सोडता… ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं!”
हा संवाद १९९३ साली रंगमंचावर सादर झालेल्या नाटकातील होता. नारकर म्हणाले, “मी तो संवाद म्हटल्यावर बाळासाहेबांच्या डोळ्यांत लालसरपणा आला, आणि ते जोरात म्हणाले, ‘अविनाश!’ त्यांना अचानक खोकला सुरू झाला. तिथे एकच धावपळ माजली.”
मग बाळासाहेब थोडा वेळ शांत बसले आणि म्हणाले, “१९९३ मध्ये केलेलं नाटक अजूनही तोंडपाठ आहे तुला…?”
त्यावर नारकर यांनी उत्तर दिलं, “हे संवाद नाहीत, हे विचार आहेत. हे तुमचे आणि सावरकरांचे विचार आहेत. हे कधीच पुसले जाणार नाहीत.”
ही संपूर्ण भावनिक आठवण अविनाश नारकर यांनी ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत शेअर केली. या आठवणींमधून कलाकार आणि एका महान नेत्यामधील विचारांची आणि भावनेची सांगड स्पष्टपणे दिसून येते.
avinash-narkar-said-something-that-made-balasaheb-thackerays-eyes-turn-red