शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयात ईडीच्या छाप्याची घटना ताजी असतानाच, आता पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची ईडीने १० तास चौकशी केली आहे. ईडीने अचानक केलेल्या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अविनाश भोसले एबीआयएल ग्रुपचे मालक आहे. एकेकाळी पुण्याच्या रस्त्यांवर रिक्षा चालवणारे भोसले आज रियल इस्टेट किंग म्हणून ओळखले जातात. जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर माणूस नक्कीच प्रगती करू शकतो याचे उत्तम उदाहरण अविनाश भोसले आहे.
अविनाश भोसले यांचा जन्म १९६० ला संगमनेरमध्ये झाला होता. आर्थिक परिस्थिती कठीण होती. अशात त्यांना आपले शिक्षण पूर्ण करायचे होते. मात्र १२ वी मध्ये अविनाश नापास झाले. पुढे काही तरी करायचे म्हणून ते पुण्याला आले आणि त्यांनी ऑटोमोबाईलच्या कोर्सला प्रवेश घेतला.
सुरुवातीला ते भाड्याच्या घरात राहायचे. त्या घराचा मालक रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय करत असल्याने आपणही काहीतरी असे करावे असे अविनाश यांना वाटले. अविनाश यांनी १० हजार रुपये देऊन पहिली रिक्षा घेतली आणि १२ रुपये शिफ्टप्रमाणे रिक्षा चालकांना चालवायला दिली.
रिक्षा चालवायला देण्याच्या या व्यवसायातून त्यांना चांगलाच फायदा झाला आणि त्यांनी बघता बघता ६ महिन्यात ३ स्वतःच्या रिक्षा घेतल्या. या व्यवसायात पण त्यांना अनेक अडचणी आल्या रिक्षा चालकांकडून पैसे वसूल करणे कठीण काम होते, त्यामुळे अनेकदा पैसे वसूल करण्यासाठी त्यांना झोपडपट्टीत जावे लागायचे.
पुढे त्यांनी बांधकाम व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. बांधकाम क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी एका बांधकाम व्यवसायिकाकडून याची पूर्ण माहिती घेतली. सुरुवातीला त्यांना काम मिळण्यात अडचण आली पण लवकर त्यांचा या व्यवसायात हात बसला आणि त्यांनी १९७९ मध्ये एबीआयएल ग्रुपची स्थापना केली.
इथून अविनाश भोसले यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ते बांधकाम व्यवसायात फक्त इमारतीच नाही तर महामार्ग, भोगदे, धरण, कॅनॉल यांचे पण बांधकाम करू लागले. आज महाराष्ट्रात अविनाश भोसले यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्याकडे आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. तसेच मर्सडीज, ऑडी, लेमोसीन, बीएमडब्ल्यू, स्कॉडा यांच्यासारख्या लॅक्सरी कार आहेत.
अविनाश यांना लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. अशात इतके पैसे असूनही त्यांनी आपली ही आवड कायम जपली आहे. बाणेरपासून २० किलोमीटर लांब असलेल्या सिंहगड येथे असलेल्या ग्राऊंडवर ते क्रिकेट खेळण्यासाठी दर रविवारी ते हेलिकॉप्टरने जातात. त्यांचेकडे तीन प्रायव्हेट हेलिकॉप्टर आहेत.
पुण्याच्या बाणेर भागात त्यांचा मोठा बंगला आहे. ज्याचे नाव त्यांनी ‘व्हाइट हाऊस’ असे ठेवले आहे. पांढऱ्या रंगाच्या या बंगल्याचा लुक पूर्ण अमेरिकेतील व्हाइट हाऊसप्रमाणे आहे.
अविनाश भोसले यांच्या मुलीचे लग्न माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या मुलाशी झाले आहे. या लग्नात अनेक सेलेब्रिटी पण आले होते. तर असा होता एक रिक्षाचालक ते रियल इस्टेट किंग अविनाश भोसले यांचा प्रवास. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.