लोकांनी झापल्यावर अवधूत गुप्तेची सपशेल शरणागती; गोखलेंच्या वक्तव्यावर म्हणाला पटलं नाही तरी…

भारताला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे भीकेत मिळालेलं स्वातंत्र्य होतं, असे कंगनाने वक्तव्य केले होते. त्यानंतर या वक्तव्याला मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे लोकांनी त्या दोघांनाही तुफान ट्रोल केले होते.

त्यानंतर संगीतकार अवधूत गुप्तेने या संपुर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. विक्रम गोखले जे काही बोलले असतील ते विचार करुनच बोलले असतील. त्यामुळे अवधूतने विक्रम गोखले यांना पाठिंबा दिला असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्याच्यावरही जोरदार टीका करण्यात होती.

आता या सर्व गोष्टींवर अवधूतने फेसबूक पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं अवधूतने म्हटले आहे. मी विक्रम गोखलेंना काका म्हणून हाक मारतो, ते जे काही बोलले तरी मान खाली घालून उभं राहणं ही आमची संस्कृती आहे, असे अवधूतने म्हटले आहे.

तसेच विक्रम गोखले जे काही बोलतात ते पुर्णपणे आम्हाला पटते असं अजिबात होत नाही. पण पटलं नाही म्हणून तोंड वर करुन सांगितलं तर ते बरोबर वाटेल का? असा प्रश्नही अवधूतने त्याच्यावर टीका करणाऱ्यांना विचारला आहे.

अवधूत गुप्तेची फेसबुक पोस्ट-

नमस्कार!
आधी दुर्लक्षित करावे असे वाटले होते. पण, काही मित्र अजूनही नाराज आहेत असे वाटते, म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम “मी ह्यावर बोलू इच्छित नाही, कारण ते वडिलांच्या ठिकाणी आहेत” असे सांगितले असता अधोरेखित शब्दांची जागा हेतूपुरस्सर बरोब्बर उलटी करुन, माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढणाऱ्या सर्व वृत्त संस्थांना मानाचा मुजरा.

एवढेच सांगेन, की लोकांच्या प्रेमाचा हा ताजमहाल मी अतिशय कष्टाने कण-कण जमवून बांधला आहे. माझ्यासाठी त्यांचे प्रेम हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. काही हजार व्ह्यूजच्या क्षुल्लक स्वार्थासाठी प्लीज त्यावर दगड मारू नका!
ही मराठी चित्रपट सृष्टी हे आमचे एक कुटुंबच आहे.

ह्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक ‘मामा‘, विक्रम ‘काका‘ अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे. ह्याचा अर्थ ते जे काही बोलतात ते सर्व आम्हास पटते असा अजिबात होत नाही. परंतु, पटले नाही म्हणून तोंड वर करून सांगणे बरोबर ठरेल काय?

त्यांच्या काळात त्यांनी नाटका पासून रुपेरी पडद्या पर्यंत आपल्या कलेने मराठी रसिक वर्ग घडवला आणि वाढवला, ज्या झाडाची फळे आज आम्ही चाखत आहोत. त्यांचे उपकार आम्ही आणि मराठी रसिकवर्ग ठरवूनही फेडू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी उतारवयात केलेले एखादे वक्तव्य हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची मेहनत आणि कमवलेला सन्मान केराच्या टोपलीत टाकू शकत नाही. राहता राहिला हा संपूर्ण वाद ज्यामध्ये पडायची माझी अजिबात इच्छा नाही. ह्याचा अर्थ माझ्याकडे सजगता नाही, असा अजिबात होत नाही.

पण, माझ्याकडे माझी स्वतःची संगीत आणि चित्रपट अशी चिरंतन टिकणारी माध्यमे असताना ह्या क्षणभंगुर समाज माध्यमांतून आणि वृत्तसंस्थाना काहीतरी विधाने देऊन मी का व्यक्त होऊ? आणि आजवर मी त्याच माध्यमातून व्यक्त होत आलेलो आहे. चित्रपट “झेंडा” पासून “जात” गाण्यापर्यंत सर्व उदाहरणं तुमच्या समोर आहेत.

बाकी, माझ्यावर आरोप करणाऱ्या मित्रांनी सांगावे, की ह्या बातमीवर जितक्या तत्परतेने प्रतिक्रिया दिलीत किंवा शेअर केलीत तितक्याच तत्परतेने माझे “जात” हे गाणे शेअर केले होते का? माझी खात्री आहे की माझ्या ह्या मित्रपरिवारातील ९९ टक्के माणसे ही अतिशय समजूतदार, माझ्यावर विश्वास ठेवून प्रेम करणारी, माणुसकीला जपणारी अशीच सुसंस्कारी आहेत. बाकीच्या मित्रांना एवढीच विनंती. की तिरस्काराचे हे विष असे पसरवू नका. ह्यामुळे होणाऱ्या त्रासाचे चटके शेवटी तुम्हाला देखील लागतीलच. काळजी घ्या!

महत्वाच्या बातम्या-
रोहितने एकाच सामन्यात तोडला दोन महान खेळाडूंचा रेकॉर्ड; आफ्रिदीलाही टाकले मागे
सुनावणीदरम्यान बनियानवरच आला होता आरोपी; संतापलेल्या न्यायाधीशांनी दिली ‘ही’ भयंकर शिक्षा
शेतकऱ्यांसाठी मोदींनी मोठं मनं केलं, एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे करणार का? भाजपचा सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.