चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. पण जगताप यांच्या कुटुंबातून कोणाला उमेदवारी दिली जाईल याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.
भाजप याबाबतीत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशात जगताप कुटुंबामध्ये उमेदवारीवरुन वाद होत असल्याचीही चर्चा आहे. लक्ष्मण जगात यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी या उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे त्याच भाजपच्या उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
असे असतानाच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी प्रयत्न सुरु केला असल्याचे म्हटले जात आहे. पण प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने जी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये शंकर जगताप यांचे नाव आलेले नाही.
चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर जगताप कुटुंबातून एकाच उमेदवाराचं नाव निवडणूकीसाठी पुढे येईल, असे म्हटले जात होते. पण दोन लोकांनी उमेदवारीचा अर्ज भरण्याची इच्छा व्यक्त केल्याने जगताप कुटुंबामध्ये वाद असल्याचे म्हटले जात आहे.
इतकंच नाही, तर दोघांच्या समर्थकांनी पोस्टर लावल्यामुळे आता पोस्टर वॉर सुद्धा पाहायला मिळत आहे. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्या समर्थकांनी पोस्टर लावत आपल्यालाच चिंचवडच्या पोटनिवडणूकीत उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक लावण्यात आली आहे. भाजपने अजूनही या निवडणूकीचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तसेच ही निवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडीने देखील तयारी केली आहे.
त्याचबरोबर महाविकास आघाडीनेही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसच्या वतीने कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल कलाटे यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आपल्या पक्षातील इच्छुक असलेल्यांनाच उमेदवारी द्यावी, अन्यथा या निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतल्याची माहिती पुढे येत आहे. चिंचवडच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून सध्या मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
आता अजितदादा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांपुढे झुकून उमेदवार बदलतात की राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांचा आदेश पाळावा लागतो याकडे लक्ष लागले आहे. पण लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणारी ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या
शरद पवारांमुळेच मुख्यमंत्रीपद हातातून गेले; अजित पवार स्पष्टच बोलले, थेट काकांची चूकच दाखवली
गौतम अदानींना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, थेट शेअर मार्केटमधूनच झाली हकालपट्टी
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, एका झटक्यात तुमची वर्दी उतरवेल..’; पोलिस स्टेशनमध्ये दारू पिऊन राडा