BCCI and Apollo Tyres Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय (BCCI) ने टीम इंडियाच्या जर्सीसाठी नवा लीड प्रायोजक निश्चित केला आहे. आता भारतीय संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर अपोलो टायर्स (Apollo Tyres) या बहुराष्ट्रीय कंपनीचं नाव दिसणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरीत्या जाहीर केलेल्या माहितीनुसार, हा करार अडीच वर्षांचा असून मार्च 2028 पर्यंत लागू राहणार आहे.
या कराराअंतर्गत प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यामागे अपोलो टायर्सकडून 4.5 कोटी रुपये बीसीसीआयला दिले जाणार आहेत. एकूण कराराची रक्कम तब्बल 579 कोटी रुपये एवढी आहे. याआधी जर्सी प्रायोजक म्हणून ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम 11 कार्यरत होतं. मात्र, नव्या सरकारी कायद्यानुसार ऑनलाइन मनी गेम प्रमोट करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे बीसीसीआयने तो करार पूर्ण होण्याआधीच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
इतर कंपन्यांचीही बोली
अपोलो टायर्ससोबतच्या या करारासाठी स्पर्धेत इतर मोठ्या कंपन्याही उतरल्या होत्या. कॅनव्हाने 544 कोटींची, तर जेके सिमेंट्सने 477 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, अखेरीस सर्वाधिक बोली मांडणाऱ्या अपोलो टायर्सच्या नावावर करार अंतिम झाला. तुलनेत याआधीचा ड्रीम 11 करार 358 कोटी रुपयांचा होता, जो तीन वर्षांसाठी केला गेला होता.
फुटबॉलमधील अपोलो टायर्सची उपस्थिती
अपोलो टायर्स केवळ क्रिकेट क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही. या कंपनीने फुटबॉलमधील मोठ्या संघांसोबतही भागीदारी केली आहे. मँचेस्टर युनायटेड, चेन्नेन एएफसी आणि इंडियन सुपर लीगमधील काही टीम्ससोबतही त्यांचे करार आहेत. त्यामुळे जागतिक क्रीडा प्रायोजकत्वात अपोलो टायर्सचं नाव एक मजबूत ब्रँड म्हणून ओळखलं जातं.
शेअर बाजारातील वाढ
या नव्या कराराच्या बातमीचा परिणाम अपोलो टायर्सच्या शेअरवरसुद्धा दिसून आला. कंपनीचा शेअर किंमत वाढून 487 रुपयेपर्यंत पोहोचली आहे. एका दिवसातच या शेअरमध्ये 7.80 रुपयांची वाढ नोंदवली गेली.