सुशांतची सुसाईड नोट नव्हती; माझ्या बापाच्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचे नाव असूनही कारवाई नाही केली

मुंबई | इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक झाली. मुंबईच्या राहत्या घरातून त्यांना पोलिसांनी अटक केली.

या कारवाईनंतर अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक आणि त्यांची पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाईक यांच्या मुलीने असा सवाल केला की, सुशांतसिंह राजपुतची सुसाईड नोट नव्हती पण माझ्या वडिलांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव आहे तरीही कारवाई केली गेली नाही?

अर्णब गोस्वामी यांनी ६ कोटी ४० लाख रुपयांमधील आमचे ८३ लाख रुपये अजून दिलेले नाही. माझ्या वडिलांच्या आणि आजीच्या मृत्यूला अर्णब गोस्वामी जबाबदार आहेत असा आरोप आज्ञा नाईक यांनी केला आहे.

पुढे अन्वय नाईक यांच्या पत्नी म्हणाल्या की, अर्णब गोस्वामी यांनी पैसे बुडवल्याने माझे पती नवीन प्रकल्प हाती घेऊ शकले नाही आणि नैराश्यात येऊन त्यांनी आत्महत्या केली.

आम्ही तक्रारही केली होती पण आम्हाला धमक्या देण्यात आल्या. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा गंभीर आरोप अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना शिक्षा होईल का? यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.