Sassoon Hospital : पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा गैरप्रकारांमुळे चर्चेत आले आहे. याआधी ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा पलायनप्रसंग, पोर्शे अपघात प्रकरणातील रक्तनमुने बदलण्याचा प्रकार आणि इतर घटनांमुळे हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
असे उघडकीस आला लाचखोरीचा प्रकार
बी. जे. मेडिकल कॉलेजच्या कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांनी फर्निचर पुरवठादाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. एसीबीने तातडीने सापळा रचून या दोघांना रंगेहाथ अटक केली. संबंधित पुरवठादाराचे दहा लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुन्हा पळाला
ससून रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कराड पोलिस ठाण्यात 354 कलमाखाली गुन्हा दाखल असलेला संतोष साठे हा आरोपी रुग्णालयातून उपचार सुरू असताना पळून गेला. याआधीही अनेक आरोपी येथे उपचार घेत असताना पळाल्याच्या घटना घडल्या आहेत.
ललित पाटील प्रकरणाचा धसका घेतला तरी सुरक्षा शिथीलच
2023 मध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्या घटनेने मोठे वादंग उठवले होते. त्यानंतर प्रशासनाने सुरक्षेत बदल करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुन्हा एकदा आरोपी पळाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुन्हेगारांसाठी ‘सुवर्णसंधी’ ठरतेय ससून रुग्णालय?
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुण्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांना येरवडा कारागृहात ठेवण्यात येते. वैद्यकीय तक्रारी आल्यास ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातात. मात्र, या सुविधेचा गैरफायदा घेत आरोपी वारंवार पळून जात असल्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे.
सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.