Anjali Damania: नाशिकमधील तपोवन परिसरात (Tapovan) झालेल्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून नाराजी व्यक्त होत असताना, नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी तब्बल १२७० झाडे तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या वृक्षतोडीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी तीव्र रोष व्यक्त करत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार टीका केली.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “एवढा विरोध होत असताना गिरीश महाजनांना मस्ती आलीय. नागरिक आंदोलन करत असतानाही त्यांनी नाशिकची झाडे तोडली. लोकांना थारा देत नाही, आम्हाला जे करायचं ते करू अशी त्यांची भूमिका आहे. आता लोकांनी त्यांना राजकारणातून फेकून द्यायला हवे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणावरील चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
नाशिक महापालिकेचे स्पष्टीकरण
महापालिकेनुसार पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन या चार ठिकाणी मलनिस्सारण केंद्रांच्या विस्तारासाठी १७२८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. त्यापैकी ४५८ झाडे वाचवण्यात आली, मात्र उर्वरित १२७० झाडे तोडावी लागली.
या वृक्षतोडीच्या बदल्यात महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून १ कोटी ७६ लाख रुपये भरपाई स्वीकारण्यात आली असून हा निधी पर्यावरणीय प्रकल्पांवर खर्च केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय फाशीच्या डोंगराजवळ १७,६८० नव्या झाडांची लागवड करण्यात आली असून यात स्थानिक प्रजातींचा समावेश असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड मोहीम
तपोवन परिसरातील साधूग्राम प्रकल्पासाठी संभाव्य १८०० झाडांच्या तोडीविरोधात नागरिक पूर्वीपासूनच आक्षेप घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने नाशिकमध्ये वृक्षलागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतातील राजमुद्री (Rajahmundry) येथे भेट देऊन झाडे निवडली. निवडलेल्या १५ हजार झाडांमध्ये वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा यांसारख्या स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. झाडे सध्या शहरात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. ठिबक सिंचन आणि जैविक खतांच्या सहाय्याने देखभालीची संपूर्ण जबाबदारी मनपा उद्यान विभागाकडे असेल.
सोमवारपासून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड मोहिमेला अधिकृत सुरुवात होणार आहे.






