Anil Parab on ST : शिवसेना (Thackeray Group) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी आज विधीमंडळाच्या विधान परिषदेत बोलताना राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस.टी. (State Transport) विभागातील कारभारावर जोरदार टीका केली. त्यांनी थेट एस.टी. ला खड्ड्यात घालणाऱ्यांची पोलखोल करत एकामागून एक आरोपांचे बाण सोडले.
अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले की, एस.टी. चा संचित तोटा आता तब्बल 10,900 कोटी रुपयांवर गेला आहे. या तोट्याला केवळ राजकीय नेतृत्व जबाबदार नसून प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सिंडिकेट (syndicate of officers) देखील कारणीभूत आहे. त्यांनी भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही जोरदार टीका केली.
परब म्हणाले, “हेच लोक एस.टी. कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेणार असल्याची वल्गना करत होते. ‘डंके की चोट पर’ सरकारी कर्मचारी बनवणार असल्याचं सांगत होते. पण आज हे सगळे ताटाखालची मांजर होऊन गप्प का बसलेत?” अशी परखड विचारणा करत त्यांनी यांच्यावर हल्ला चढवला.
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या आंदोलनाची आठवण करून दिली
परब यांनी भाषणात पुढे नमूद केलं की, सदाभाऊ खोत यांनी मुंबईतील आझाद मैदानात तब्बल 15 दिवस ठाण मांडलं होतं. त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की, “जोपर्यंत एस.टी. कर्मचारी शासकीय कर्मचारी होत नाहीत, तोपर्यंत एस.टी. चं एकही चाक रस्त्यावर फिरणार नाही.” मात्र, आज त्यांची आणि इतरांची भूमिका मवाळ का झाली आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“एस.टी. कर्मचाऱ्यांना भडकावलं, पाच महिने संप घडवला”
अनिल परब (Anil Parab) यांच्या म्हणण्यानुसार, एस.टी. कर्मचाऱ्यांना आमिष दाखवण्यात आलं, त्यांना भडकावण्यात आलं आणि त्यामुळेच तब्बल पाच महिने चाललेला संप उभा राहिला. यामुळे हजारो कर्मचारी कर्जबाजारी झाले. परब म्हणाले, “एक महिन्याचा पगार मिळाला नाही तरी कर्मचारी सावकाराकडे जातात, पण इथे तर पाच महिने पगार मिळालाच नाही. याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
“पहिल्यांदा एस.टी. वाचवा, मग कर्मचारी”
परब यांनी स्पष्टपणे सांगितले की, “एस.टी. आधी वाचवली पाहिजे, मग कर्मचारी. पण या तथाकथित नेत्यांनी कर्मचार्यांच्या गळ्यावर सूरी फिरवली आणि एस.टी. चा बळी घेतला.” त्यांनी हे देखील ठामपणे म्हटलं की, पाच महिने एस.टी. बंद ठेवण्याचं पाप या नेत्यांनी केलं आहे.
या भाषणामुळे विधान परिषदेत एकच खळबळ उडाली. परब यांनी थेट नावं घेऊन आरोप केल्याने विरोधकही काही काळ गप्प झाले. एस.टी. बद्दलचा हा वाद आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनू शकतो.