Anil Parab : राज्याचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्याने दोन्ही गट विविध मुद्द्यांवरून आमनेसामने येत आहेत. यातच आता दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये प्रचंड वाद पेटलेला आहे.
मुंबई येथील शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जात असतो. मात्र, आता दोन गट पडल्याने दोन्ही गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला होता. परंतु, महापालिकेने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत दोन्ही गटाचा अर्ज फेटाळला आहे.
त्यामुळे आता शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली आहे. तसेच शिंदे गटाने शिवाजी पार्कला पर्याय म्हणून बीकेसी मैदानाची निवड केली आहे. ठाकरे गट मात्र दसरा मेळावा घेण्यासाठी अजूनही शिवाजी पार्कवरच अवलंबून आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळाव्यासाठी तुम्ही अन्य जागांचा पर्याय निवडला आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जोपर्यंत शिवाजी पार्कचा निर्णय होत नाही तोपर्यंत पुढचा विचार होणार नाही. दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळेल अशी आम्हाला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कोर्टाने आम्हाला ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटींचे आम्ही यापूर्वीदेखील पालन केले आहे. १९६६ पासून कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आलेला नाही, असेही परब यावेळी म्हणाले. कोर्टात योग्य तो निर्णय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दसरा मेळाव्याला अपशकुन करण्याची ही वृत्ती आहे. १९६६ पासून दसरा मेळावा आणि शिवसेना हे समीकरण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मेळाव्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही दसरा मेळाव्यासंदर्भातील योग्य ती कागदपत्रे कोर्टासमोर दाखल केली आहेत आणि शिवसेनेचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे
politics : आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल; शिंदे गटातील नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
Shivsena : परवानगी मिळो ना मिळो दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार’, शिवसैनिक आक्रमक