Homeइतर…आणि सिंधूताई त्यांना म्हणाल्या, ‘तुला नवरा म्हणून नव्हे तर बाळ म्हणून सांभाळेल'

…आणि सिंधूताई त्यांना म्हणाल्या, ‘तुला नवरा म्हणून नव्हे तर बाळ म्हणून सांभाळेल’

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. सिंधुताईंनी अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत, हालअपेष्टा सहन करत, आपलं आयुष्य जगलं. ज्याचं कोणी नाही त्याचं आपण असं म्हणत आयुष्यात अनेकांची सेवा केली. ज्याच्यामुळे सिंधुताई सपकाळ यांच्यावर बिकट परिस्थिती आली, त्या नवऱ्याला देखील माफ करून लेकरासारखं संभाळलं.

सिंधुताई सपकाळ दहा वर्षांच्या असताना त्यांचे ३५ वर्षाच्या व्यक्तीशी लग्न लावलं. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी सिंधुताई सासरी नांदायला गेल्या. नवऱ्याने कधीच प्रेमाने जवळ केले नाही. कवितेची आवड असणाऱ्या सिंधुताईंच्या हातात कागद असणं नवऱ्याला कधीच सहन झालं नाही. नवरा शिकलेला नव्हता. त्याला वाजता येत नाही आणि सिंधुताईंना वाचता येतं पाहून त्यांना प्रचंड राग यायचा. यावरून सिंधुताईंना अनेकदा मारहाण देखील करण्यात आली.

वयाच्या २० व्या वर्षी सिंधुताई गरोदर झाल्या. मात्र, त्यांना नवऱ्याने पोटावर लाथ घालून हाकलून दिलं. माहेरच्या लोकांनी देखील त्यांना स्वीकारलं नाही.त्यांच्या आईने देखील त्यांना हाकलून लावलं. नवजात बाळाची नाळही सिंधुताईंनी स्वतःच्याच हाताने दगडाने मारून तोडली होती. अनेकवेळा आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. भुकलेल्याला दोन घास द्यायचे. तहानलेल्याला पाणी पाजायचं म्हणून त्यांनी भिकाऱ्यांची सेवा केली.

अखेर पुण्यात त्यांनी ममता बाल सदन नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर त्या देशभर अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सिंधुताईंचा सत्कार झाल्यानंतर नवरा रडत त्यांच्याकडे आला. सिंधुताईंनी क्षणाचा विचार न करता नवऱ्याचे पदराने तोंड पुसलं. सिंधुताई यावेळी नवऱ्याला म्हणाल्या, “तुम्ही सोडलं म्हणून माझ्याकडून घडलं. आता मला तुमच्या सेवेची संधी द्या.”

सिंधुताईंनी नवऱ्याला संस्थेत आणलं. नवऱ्याला त्या म्हणाल्या, तू आता नवरा नाहीस तर माझं लेकरू म्हणून इथं आला आहेस. इतर लेकरांप्रमाणे तुझीही सेवा करू असे त्या म्हणाल्या. याविषयी सिंधू ताईंना एका कार्यक्रमात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले होते, “वाईटातून चांगलंही घडतं. फक्त चालत राहणं आपल्या हातात आहे. कशाचीही खंत बाळगू नका. मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं जर काय काम केलं असेल, तर दगडं मारून हाकलून देणाऱ्या माझ्या पतीला मी माफ केलं. तसंच मला साथ न देणाऱ्या आईलाही माफ केलं.”

गेल्याच वर्षी सिंधुताईंना पदमश्री मिळाला होता. त्यानंतर जगभरात त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले होते. अनाथांची माय ही सिंधुतांइंची खरी ओळख. त्याच्या जाण्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय, क्रीडा, सामाजिक अशा सर्वच स्तरातील दिग्गजांनी सिंधुताईंच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

महत्वाच्या बातम्या
एवढ्या थंडीत दिशा पटानीने समुद्राच्या पाण्यात क्लिक केला फोटो, नेटकरी म्हणाला, ‘कोणतं च्यवनप्राश खातेस’
फक्त ५० हजारात सुरू करा हा बिझनेस, महिन्याला होईल लाखोंची कमाई, सरकारही देतंय अनुदान
हेच का ‘सब का साथ?’ शेकडो महिलांच्या ऑनलाईन लिलावावरून जावेद अख्तरांचा मोदींना सवाल