….आणि आबा म्हणाले काहीही कारवाई वगैरे करू नका सोडून द्या पोरांना

आर आर पाटील उर्फ आबा यांची आज जयंती. लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत. त्यांचे साधेपणा हीच त्यांची ओळख होती. आबा हे शेवटपर्यंत आबाच राहिले. त्यांचे साधेपणाचे किस्से सर्वांनाच माहीत असतील.

हे त्यांचं वेगळेपण होतं. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा मोठा पल्ला गाठला तरी त्यांचे पाय मातीशी जुळलेले होते. ते उपमुख्यमंत्री व्हायच्या आधी एक शेतकरी होते त्यामुळे त्यांना मातीची जाणीव होती.

जेव्हा आबा गृहमंत्री होते तेव्हा त्यांच्याबरोबर अनेक किस्से घडले होते. त्यांचे कार्यकर्ते आवडीने ते किस्से सांगत असतात. एवढेच काय विरोधी पक्षातील नेतेही आबांना मानत होते. असाच एक किस्सा रिपाइंच्या कार्यकर्त्यासोबत घडला होता.

एकदा रिपाइंचे अध्यक्ष म्हणजे रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, गृहमंत्री आर आर पाटील यांची गाडी अडवून आंदोलन करा. आता गृहमंत्र्यांची गाडी अडवून आंदोलन करायचे म्हणजे सोपे काम नव्हते. तरी काही जण म्हणाले आम्ही आंदोलन करणार.

त्यांना कोठुनतरी माहिती मिळाली होती की, आबा आर्थर रोड जेलला पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यांनी ठरवलं गाडी अडवायची आणि मुर्दाबादचे नारे द्यायचे. मग काय कार्यकर्ते पोहोचले आर्थर रोड जेलच्या बाहेर.

त्यांना लाल दिव्याच्या गाडीचा ताफा येताना दिसला त्यांनी गाडी अडवली आणि आंदोलन करण्यास सुरुवात केली. पण गंमत अशी झाली की, त्या गाडीत आबा नव्हतेच. त्या गाडीत न्यायाधीश जेलची पाहणी करायला आले होते.

पोलिसांनी रिपाइंच्या कार्यकर्त्यांना बांबूने मारले आणि शेवटी त्याच आर्थर रोडच्या जेलमध्ये टाकले. १५ मिनिटांनी आबा जेलमध्ये पोहोचले. जेलच्या एका कोपऱ्यात त्या २०-२५ कार्यकर्त्यांना ठेवले होते. आबा पहिल्यांदा तर त्यांना बघून हसले.

पण नंतर त्यांनी न्यायाधीशांना सांगितले की, काहीही कारवाई वगैरे काहीही करू नका. या सर्व मुलांना सोडून द्या. हा सर्व किस्सा स्वतः रिपाइंच्या कार्यकर्त्याने सांगितला आहे. पुढे एकदा आबा त्याला परत एकदा भेटले होते.

त्याने सांगितले की, एकदा आबा मला रस्त्यात भेटले होते. मला पाहून त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि हात मिळवला. एवढा मोठा गाड्यांचा ताफा त्यांनी माझ्यासाठी थांबवला हे मी कधीही विसरू शकणार नाही.

गाडीच्या खिडकीतून बाहेर हात टाकून बसायची पद्धत, त्यांचा उत्साही चेहरा, कामाची आवड हे सर्व पाहून असे वाटते आबा आता माझ्या समोरून गाडीतून गेले आहेत. असे तो किस्सा सांगताना म्हणाला. म्हणजे आबा किती दिलदार मनाचे व्यक्ती होते हे यातून दिसून येते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.