Anandacha Shidha Yojana: राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सणासुदीच्या काळात थोडासा गोडवा आणणारी ‘आनंदाचा शिधा योजना’ (Anandacha Shidha Yojana) यंदा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. महायुती सरकारने सुरू केलेली ही लोकप्रिय योजना आर्थिक तुटवड्यामुळे आता थांबली आहे. राज्य सरकारची शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) योजना आधीच ठप्प झाली असताना, आता ही दुसरी महत्त्वाची योजना देखील इतिहासजमा होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सणासुदीच्या काळात मिळायचा ‘आनंदाचा शिधा’
या योजनेचा उद्देश होता. सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना थोडासा आनंद मिळावा. दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) जयंतीच्या निमित्ताने राज्यातील रेशन दुकानांवरून (Ration Shops Maharashtra) नागरिकांना विशेष किट वाटप केलं जायचं. या किटमध्ये एक किलो चणा डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल असायचं. लाभार्थ्यांना हा शिधा केवळ १०० रुपयांत मिळत होता.
2023 मध्ये दिवाळी, गौरी-गणपती, अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) जयंतीसारख्या प्रसंगी सरकारने मोठ्या प्रमाणात या किटचे वितरण केले होते. पण यंदा ना गणेशोत्सवात, ना येणाऱ्या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याने सामान्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
अतिवृष्टी, नुकसान आणि अपेक्षा धुळीस मिळाल्या
मराठवाडा (Marathwada Region) आणि सोलापूर (Solapur District) या भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना या परिस्थितीत सरकारकडून किमान या भागात तरी आनंदाचा शिधा मिळेल, अशी आशा होती. मात्र, दिवाळी अवघ्या काही दिवसांवर असतानाही कोणतीही सरकारी हालचाल न दिसल्याने, यंदा त्या भागातही ही योजना लागू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
सत्तेपूर्वी गाजवलेल्या योजना
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी अनेक आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. परंतु सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी “एकही योजना बंद नाही” असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. निधीअभावी शेतकऱ्यांसाठीची मोफत वीज योजना, लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), शिवभोजन आणि तीर्थाटन योजना मृतप्राय अवस्थेत आहेत.
आनंदाचा शिधा म्हणजे काय?
ही योजना मुख्यत्वे पिवळ्या आणि नारंगी रेशन कार्डधारकांसाठी होती. पांढऱ्या रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ नव्हता. प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकाला 100 रुपयांत एक किलो पामतेल, रवा, चणाडाळ आणि साखर मिळत होती. सुरुवातीला या योजनेचा फायदा तब्बल एक कोटी ७२ लाख शिधापत्रिकाधारकांनी (Ration Card Holders Maharashtra) घेतला होता. मात्र, आता निधीअभावी या योजनेवर ‘कात्री’ लावण्यात आली आहे.
आर्थिक अडचणीचं कारण सांगून सरकारने योजना थांबवल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. सणासुदीच्या काळात गरीबांच्या घरात दिवाळीचा गोडवा आणणारी ही योजना थांबल्याने, सरकारची लोकाभिमुख भूमिका प्रश्नचिन्हात आली आहे. आता लोकांमध्ये एकच प्रश्न आहे. “तिजोरी रिकामी असताना सत्ताधारींच्या गप्पा किती काळ चालणार?”